परिवहन महामंडळाकडून दंडात्मक कारवाई
प्रवासी उत्पन्न, भारमान आदी गोष्टींमध्ये दररोज नवनवे नीचांक गाठणाऱ्या एसटी महामंडळाला फुकटय़ा प्रवाशांचा जाच काही नवीन नाही. मात्र, एसटीच्या प्रतिष्ठित ‘शिवनेरी’ सेवेतून एसटीचे दोन अधिकारीच विनातिकीट प्रवास करताना आढळले. या दोघांवर एसटीने दंडात्मक कारवाई केली आहे.
समाजातील विद्यार्थी, अपंग, कर्करोगी अशा २३ घटकांना एसटीने तिकिटात सवलत देऊ केली आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने एसटीचे तिकीट काढल्याशिवाय प्रवास करणे नियमबाह्य़ आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात एस. टी. साबळे हे साहाय्यक वाहतूक अधीक्षक आणि ए. पी. चोपडे भांडार अधिकारी म्हणून काम करतात. हे दोन्ही अधिकारी पुण्यात राहत असल्याने ते कामानिमित्त मुंबई-पुणे प्रवास करत असतात. गेल्या सोमवारी या दोघांनी मुंबईत येण्यासाठी शिवनेरी बस पकडली. त्याच वेळी मंत्रालयातील एक कर्मचारी मुंबईत येण्यासाठी याच बसमध्ये चढले. या प्रवाशाला २८ क्रमांकाचे आसन मिळाले असता त्या प्रवाशाने पहिल्या दोन आसनांवर बसता येईल का, अशी विचारणा केली. त्या वेळी, ही आसने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असून तेथे एसटीचे अधिकारी बसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या अधिकाऱ्यांनी तिकीट काढले नसल्याचेही या प्रवाशाच्या लक्षात आले.
याबाबत एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्रार केल्यानंतर रावते यांनी याबाबतची सविस्तर चौकशी केली.
या चौकशीनंतर सदर तक्रारीत तथ्य आढळल्याने रावते यांनी या दोन अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. विनातिकीट प्रवास करताना हे कर्मचारी व अधिकारी इतर प्रवाशांशीही उद्धट वर्तन करत असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाकडे आल्या आहेत. आता अशा अधिकाऱ्यांना व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

तिकिटांच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम या अधिकाऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे. विशेष म्हणजे एसटी अधिकाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करताना त्या तिकिटाचे पैसे तिकीट सादर केल्यावर परत मिळतात. तरीही अधिकारी तिकीट काढत नसल्याचे अनेकदा आढळते.