केवळ ३३९ निलंबित कर्मचारी कामावर

मुंबई :  कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द होईल, असे आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिले होते. परंतु त्यांच्या आश्वासनाला निलंबित कर्मचाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. तीन दिवसांत अवघे ३३९ निलंबित कर्मचारी कर्तव्यावर परतले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.  

एसटीचे राज्यातील २१ हजार ३७० कर्मचारी हजर झाले आहेत. प्रत्यक्ष संपात ६८ हजार १७८ कर्मचाऱ्यांचा सहभाग असून कर्मचारी परतण्याचे प्रमाण कमीच आहे. एसटीचे एकूण २५० पैकी १२५ आगार अंशत: सुरु आहेत, तर १२५ आगार बंदच आहेत. ५० टक्के  आगार सुरु झाल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन हजार ६३९ फेऱ्यांद्वारे एसटीची वाहतूक सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सोमवारी १४९ निलंबित कर्मचारी कामावर परतले. तर तीन दिवसांत एकूण ३३९ निलंबित कर्मचारी कर्तव्यावर हजर झाल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

बडतर्फीची कारवाई?

आतापर्यंत १० हजार २८० कर्मचारी निलंबित झाले आहेत. कर्तव्यावर परतलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार आहे. परंतु उर्वरित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. निलंबन झाल्यावर पंधरा दिवसांत नोटीसला उत्तर देणे अपेक्षित असते. अशा कर्मचाऱ्यांनीही अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात आली. मात्र या कर्मचाऱ्यांनी उत्तर सादर केलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस पाठवण्यात येणार आहे. या नोटीसला कर्मचाऱ्यांनी सात दिवसांत उत्तर देणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास कर्मचारी बडतर्फ होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.