scorecardresearch

एसटी संपावर कर्मचारी ठाम; आझाद मैदानात आज आंदोलन

सोमवारी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी अहवालाचा निषेध नोंदविला आणि विलीनीकरणाची मागणीही केली.

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या मागणीसाठी राज्यातील विविध भागांतून मंगळवारी आझाद मैदानात मोठय़ा संख्येने एसटी कर्मचारी आंदोलनासाठी येणार आहेत. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चार महिन्यांपासून संप पुकारला आहे. त्यासाठी शासनाकडून तीनसदस्यीय समितीही नेमण्यात आली. त्यांच्या अहवालानुसार विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी १०  मार्चपर्यंतची मुदत दिली. मात्र कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. सध्या अधिवेशन सुरू असून हा मुद्दा पुन्हा आक्रमकपणे मांडण्यासाठी मंगळवारी राज्यभरातून आझाद मैदान येथे एसटी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आल्याची माहिती लढा विलीनीकरणाचे सदस्य व एसटी कर्मचारी सतीश मेटकरी यांनी सांगितले. या आंदोलनासाठी आमदार गोपीचंद पडळकरही उपस्थित असतील. दरम्यान, सोमवारी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी अहवालाचा निषेध नोंदविला आणि विलीनीकरणाची मागणीही केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St workers strike continue protest in azad maidan today zws

ताज्या बातम्या