मुंबई : ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा २०२४’मधील (एनआयआरएफ) देशातील सर्वोच्च १०० महाविद्यालयांच्या यादीत मुंबईतील एकमेव फोर्ट परिसरातील सेंट झेविअर्स महाविद्यालयाने ५२.६० गुण प्राप्त करून ८९ वे स्थान पटकावले. तर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय ५६.७७ गुणांसह ४५ व्या स्थानी, नागपूरमधील शासकीय विज्ञान संस्था ५४.९१ गुणांसह ६४ व्या स्थानी आणि अमरावतीतील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय ५१.८६ गुणांसह ९९ व्या स्थानी आहे. सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या संकुलात असणाऱ्या सोयी-सुविधांचाही विचार करण्यात आला. महाविद्यालयाने संशोधन निकषात १०० पैकी ३०.१५ गुण, माजी विद्यार्थ्यांचा मागोवा आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरी निकषात ७४.१७ गुण, सर्वसमावेशक शिक्षण व अभ्यासक्रम व्याप्ती निकषात ५९.४४ गुण, नवीन अभ्यासक्रम, शिक्षक संख्या व त्यांची पात्रता, अध्यापन व अभ्यासपद्धती निकषात ४७.८३ गुण, समाजातील नागरिकांचा महाविद्यालयाबद्दलचा दृष्टिकोन निकषात ४४.७२ गुण प्राप्त केले. हेही वाचा - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ५९ पोलिसांना पदके जाहीर, मुंबईतील सदानंद राणे, हातिस्कर व होनमाने यांचा समावेश हेही वाचा - मुंबई : ‘मेट्रो १’वरील दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम, मंगळवारी ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास ‘एनआयआरएफ’मध्ये गतवर्षी १०१ ते १५० या क्रमवारीत होतो, त्यामधून ८९ व्या स्थानी येणे ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र काहीसे असमाधानीही असून पुढच्या वर्षी अधिक चांगला क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गेल्या ३ ते ४ वर्षांत व्यवस्थापनाने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन दिल्यामुळे देशातील सर्वोच्च १०० महाविद्यालयांच्या यादीत क्रमांक लागला. विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, व्यवस्थापन आदी सर्वांच्या सहकार्याने हे यश संपादन केले आहे’, असे मत सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.