मुंबई : माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत धोकादायक झाली असल्याचे सांगत प्रशासनाने रुग्णभरती अचानक बंद केल्यानंतर आता या रुग्णालयाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कर्मचाऱ्यांना किंवा कामगार संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने अचानक रुग्णालय बंद केल्यामुळे सुमारे साडे नऊशे कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. तसेच हे रुग्णालय पुन्हा सुरू होणार की नाही याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

माझगाव येथील प्रिन्स अली खान हे खाजगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयाची इमारत साधारण ७५ वर्षे जुनी आहे. इमारतीच्या संरचनात्मक तपासणीच्या अहवालात इमारत धोकादायक असल्याचे आढळून आले असल्याचे सांगून संस्थेने २२ ऑगस्ट रोजी रुग्णालयातील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेतला. तसेच नवीन रुग्ण दाखल करण्यात येणार नसल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले होते.तसेच शस्त्रक्रिया विभागही बंद करण्यात आला. रुग्णालयात तशी नोटीस लावण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली. अचानक रुग्णालय बंद केल्यामुळे सध्या सर्व कर्मचारी चिंतेत आहे. मात्र तडकाफडकी रुग्णालय बंद केल्यामुळे यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचे संशय कामगारांनी व्यक्त केला आहे. ही इमारत पुनर्विकासासाठी देऊन रुग्णालय कायमस्वरूपी बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप रुग्णालयातील कामगारांनी केला आहे. या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कामगार, कर्मचारी असे मिळून साडे नऊशे कर्मचारी आहेत. या सगळ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती संघटनेचे मंगेश तळेकर यांनी दिली.

रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने खाजगी पद्धतीने ही संरचनात्मक तपासणी करून घेतली होती. संस्थेतर्फे इमारतीची नियमित डागडुजी व देखभाल केली जात असली तरीही इमारत धोकादायक झाली असल्याचा अहवाल देण्यात आला असल्यामुळे कामगारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, या इमारतीची आणखी एकदा संरचनात्मक तपासणी केली जाणार असून त्यानंतरच रुग्णालयाबाबत अंतिम निर्णय प्रशासनातर्फे घेतला जाणार आहे. त्यामुळे कामगारांच्या व रुग्णालयाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता आहे.