अंदाजापेक्षा चार दिवस आधीच अंदमानात धडकलेला मान्सून दोन पावले पुढे येऊन थबकला आहे. गेले तीन दिवस श्रीलंकेजवळ थांबलेले मान्सूनचे वारे पुढे येण्यासाठी हवामानाची स्थिती अनुकूल नाही. दरम्यान मुंबईतील किमान तापमानही ३० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचत असल्याने पहाटेच्या गारव्यालाही मुंबईकर मुकले आहेत.
मान्सूनचे वारे येत नसले तरी नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे सोबत भरपूर बाष्प घेऊन येत आहेत. कमाल तापमान ३५ अंश से. आणि सोबत ७० ते ८० टक्के सापेक्ष आद्र्रता यामुळे दुपारी घामाच्या धारांमध्ये भिजण्याची वेळ येते. रात्री वाऱ्यांची दिशा बदलत असल्याने तापमान काहीसे कमी होते. मात्र सध्या पूर्वेकडून येत असलेले वारेही क्षीण झाले असल्याने रात्रीच्या तापमानातही फारशी घट होताना दिसत नाही. शनिवारी सकाळी कुलाबा व सांताक्रूझ येथे किमान तापमान २९.४ अंश से. होते. हिवाळ्यातील दुपारच्या तापमानापेक्षाही हे तापमान अधिक आहे. मे महिन्यात असे तापमान सामान्य आहे. बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने कमाल व किमान तापमानात फारसा फरक नसतो, असे मुंबई वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  
 मुंबईचे आकाश गेले काही दिवस ढगाळ दिसत असले तरी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडण्याची शक्यता नाही. मान्सूनचे वारेही अजून श्रीलंकेतच अडकून पडले आहेत. मान्सूनचे वारे ३० मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला होता. अंदमानात २० मेऐवजी चार दिवस आधीच पोहोचलेले वारे आता मात्र थबकले आहेत. केरळमध्ये मान्सूनने प्रवेश केल्यावर साधारण आठवडाभराने तो मुंबईत दाखल होतो. त्यामुळे उन्हाने हाल होत असलेल्या मुंबईकरांची नजिकच्या काळात सुटका होण्याची शक्यता नाही.