पुनर्विकासामुळे जागेची अडचण, माल उतरवणे कठीण

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमध्ये झालेले आर्थिक नुकसान, कडक निर्बंधांमुळे आलेले वेळेचे बंधन आणि निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता विक्रीयोग्य साहित्य मंडईत आणण्यासाठी झालेली नाकाबंदी यामुळे महात्मा फुले मंडईतील ५४५ परवानाप्राप्त गाळेधारक त्रस्त झाले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात मंडईचा पुनर्विकास सुरू असल्यामुळे मंडईत विक्रीयोग्य साहित्य घेऊन येणारे ट्रक, टेम्पो उभे करण्यासाठी जागाच नसल्याने आणि रस्त्यावर वाहन उभे केल्यानंतर होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे साहित्याची आवक-जावक कशी करायची, असा प्रश्न गाळेधारकांसमोर उभा राहिला आहे.

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महात्मा फुले मंडईच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पालिकेने हाती घेतले आहे. विविध सुविधांचा समावेश असलेली इमारत बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी मंडईतील सुमारे १३७ फळ विक्रेत्यांना मंडईलगतच्या डॉ. डी. एन. रोडवरील सार्वजनिक वाहनतळाच्या जागेत उभारलेल्या कंटेनर स्टॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पूर्वी मंडईतील फळ विक्रेते आणि परवानाधारक गाळेधारकांचे विक्रीयोग्य साहित्याची आवक-जावक करण्यासाठी मंडई आणि सार्वजनिक वाहनतळादरम्यानची (क्लॉक टॉवर ते प्रवेशद्वार क्रमांक २) जागा मोकळी सोडण्यात आली होती.

 वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून टेम्पो, ट्रकमधून येणाऱ्या साहित्याची मंडईत ने-आण करण्यात येत होती. मात्र, पुनर्विकासासाठी स्थलांतरित केलेल्या फळ विक्रेत्यांची याही जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फळ विक्रेत्यांची फळे घेऊन येणारे ट्रक, टेम्पो उभे करण्यासाठी पालिकेने वाहनतळाच्या एका टोकाला व्यवस्था केली आहे. मंडईतील ५४५ परवानाधारक गाळेधारकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. परवानाधारक गाळेधारकांचे गाळे मंडईत आहेत. परंतु मंडईबाहेर वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांतून येणाऱ्या विक्रीयोग्य साहित्याची आवक-जावक करणे गाळेधारकांसाठी अवघड बनले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी मंडईत दर दिवशी सुमारे १०० ते १२५ ट्रक, टेम्पोतून मालाची आवक होत होती. आता वाहनेच उभी करण्यास नसलेली जागा आणि होणारी दंडात्मक कारवाई यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. लवकरच मोठय़ा प्रमाणावर आंब्याची आवक सुरू होईल. त्या वेळी वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न भेडसावत असल्याचे कारले यांनी सांगितले. या संदर्भात पालिकेच्या बाजार विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. हा प्रश्न केवळ गाळेधारकांचा नाही, तर टेम्पो, ट्रकचालक आणि मालाची ने-आण करणारे माथाडीच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे, असेही ते म्हणाले. रस्त्यावर वाहन उभे केल्यानंतर दंडात्मक कारवाई होत असल्याने ट्रक, टेम्पोचालकही हैराण झाले आहेत. गाळेधारकांकडे मालाची रसद कमी होऊ लागल्याने ग्राहकही मंडईकडे पाठ फिरवू लागले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर व्यवसाय पूर्ववत होईल असे वाटत होते. पण मंडईच्या दारी नवे संकट उभे राहिल्याने गाळेधारक हवालदिल झाले आहेत.  – रत्नाकर कारले, अध्यक्ष, महात्मा फुले मार्केट दुकानदार सेवा संस्था