Bandra Stampede Update News : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. . रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. दरम्यान, या घटनेचा घटनाक्रम पोलिसानी सांगितला आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील हे एबीपी माझाशी बोलत होते.
मनोज पाटील म्हणाले, “अंत्योदय एक्स्प्रेस ही साप्ताहिक रेल्वे आहे. वांद्रे ते गोरखपूर या दरम्यान प्रत्येक रविवारी ही गाडी चालवली जाते. नेहमी या ट्रेनला गर्दी असते. या ट्रेनला २२ कोच लावले जातात. सर्व जनरल कोच आहेत. म्हणजेच कोणतंही बुकींग व रिझर्व्हेशन नसतं. त्यामुळे या ट्रेनला गर्दी असते.”
पोलिसांनी प्रवाशांच्या रांगा लावल्या होत्या, पण…
“रेल्वेकडून दिवाळीसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्यात येतात. परंतु, कालची एका स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर झाल्याने ती रद्द करण्यात आली. त्या ट्रेनची गर्दी अंत्योदय एक्स्प्रेसला आली. त्यामुळे ही घटना घडली. या ठिकाणी पोलीस हजर होते. रांगा लावण्याचंही काम सुरू होतं. परंतु, जागा मिळवण्यासाठी झुंबड उडाली अन् ही घटना घडली”, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा >> Bandra Terminus : मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, ९ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर
जखमींवर उपचार सुरू
द
दरम्यान, या घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले असून गंभीर जखमी कोणीही नाही. इंद्रजित साहनी यांच्या उजव्या मांडीला मार लागला होता. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. दोघांना प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.
प्रवाशांनी हुल्लडबाजी केली
्
“एक्स्प्रेस उशिरा येणार असल्यास प्रवाशांच्या रांगा लावल्या जातात. त्यांना रांगेत बसवलं जातं. यावेळीही पोलिसांनी प्रवाशांची रांग लावली होती. परंतु एक्स्प्रेस फलाटावर येताच लोकांनी हुल्लडबाजी केली त्यामुळे सदर घटना घडली”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
अरविंद सावंतांकडून रेल्वे प्रशासनावर टीका
“गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या झालेल्या अपघातांची चौकशी रेल्वे विभागाने केली पाहिजे. केंद्रीय रेल्वे मंत्री हे रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे कायम दुर्लक्ष करत आहेत. केंद्र सरकार सध्या सर्व खासगीकरण करत आहे. रेल्वे विभागातील अधिकारी हे प्रवाशांबरोबर व्यवस्थित वागत देखील नाहीत. उर्मट भाषा बोलतात पण त्यांना अभय कोणाचं आहे? रेल्वे प्रशासनाकडे गाड्यांची सख्या वाढण्याची मागणी केली तरी ते देत नाहीत”, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.