scorecardresearch

विशेष निधीसाठी ६५० कोटींची तरतूद ; स्थायी समितीची अर्थसंकल्पाला मंजुरी

पालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता.

मुंबई : पालिकेच्या आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अतिरिक्त तरतुदींना भाजपने केलेला विरोध झुगारून सत्ताधारी शिवसेनेने ६५० कोटींची अतिरिक्त तरतूद विशेष निधीसाठी केली. नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी ही तरतूद असली तरी भविष्यात कोण निवडून येणार याची खात्री नसताना ही तरतूद नक्की कोणासाठी केली, असा सवाल भाजपने केला आहे.

पालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. या अर्थसंकल्पावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मंगळवारी या चर्चेचा समारोप करीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्प मंजूर केला.

यंदाच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी ६५० कोटींची तरतूद करण्यात आली असून या निधीचा फायदा निवडून येणाऱ्या नवीन नगरसेवकांना होणार आहे. ज्या प्रभागातील नगरसेवक विकासकाम करण्यासाठी पत्र देतील, त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

३ फेब्रुवारी रोजी ४५९४९.२१ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकारमान असलेला अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी स्थायी समितीला सादर केला. स्थायी समितीत या अर्थसंकल्पावर तब्बल ११ तास चर्चा झाली. स्थायी समितीच्या २६ पैकी १२ सदस्यांनी अर्थसंकल्पावर भाषण केले. भांडवली आणि महसुली अर्थसंकल्पात बदल सुचवून विकासकामांसाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद स्थायी समितीत प्रशासनाने केली आणि त्यास मान्यता दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संमतीने ही तरतूद करण्यात आली. या ६५० कोटी रुपयांच्या तरतुदीला समिती सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती यशवंत जाधव यांनी दिली.

२४ विभागांत समान निधी

२३६ प्रभागांना प्रत्येकी १ कोटी

६५० कोटींच्या विशेष निधीतून नव्याने बनवण्यात आलेल्या २३६ प्रभागांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेची मुदत येत्या ७ मार्चला संपत असल्याने पालिकेच्या २४ विभागांत निधीचे समान वाटप केले जाणार आहे. यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे नगरसेवक जास्त किंवा कमी संख्येने निवडून आल्यास कोणावरही अन्याय होणार नाही असे निधीचे वाटप केले जाईल. तसेच राजकीय पक्षांना त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्याचा निर्णय येत्या काळात घेतला जाईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

भाजपचा सभात्याग भाजपने या अतिरिक्त तरतुदीला आधीच विरोध केला होता व तसे पत्रही आयुक्तांना दिले होते. पालिकेच्या प्रचलित प्रथा-परंपरेनुसार नवीन महापालिका स्थापन झाल्यानंतरच अतिरिक्त तरतुदी कराव्यात आणि अर्थसंकल्प संमत करावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली होती. मात्र तरीही या तरतुदी केल्यामुळे भाजपने सभात्याग केला. महापालिका सीमा निश्चित झालेल्या नसतानाही, आरक्षण पडलेले नसताना ही तरतूद कशासाठी, पालिकेचे उत्पन्न कमी झालेले असताना ही तरतूद कशासाठी, असाही सवाल शिंदे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Standing committee approves bmc budget zws

ताज्या बातम्या