मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा हटवल्यावरून भाजप आणि मनसे यांच्यात सध्या वाद सुरू असताना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतही भाजप आणि मनसेत वाद रंगला. कुर्ला परिसरात पावसाचे पाणी उपसण्याच्या पंपाचे काम भाजपच्या निकटवर्तीयाला दिल्याचा आरोप मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत गोंधळ घातला. तेव्हा मराठी माणसाला काम देऊ नये का असा प्रश्न उपस्थित करून अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मनसेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काही काळ भाजपचे सदस्य आणि मनसेचे एकटे किल्लेदार यांच्यात वादावादी झाली.

पुण्यातील एका महाविद्यालयात शासनाच्या निर्देशानुसार लावण्यात आलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी काढून टाकल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. त्यातच मुंबई महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मनसे आणि भाजप यांच्यात वाद झाला. कुर्ला पश्चिम येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या जवळ पावसाचे पाणी साचते. भरतीच्या वेळी नेहरू नगर नाल्याच्या पाण्याची पातळी वेगाने वाढते. त्यावेळी नाल्याच्या पाण्याचा उलट प्रवाह पर्जन्य जलवाहिन्यामध्ये शिरतो. त्यामुळे या पाण्याचा निचरा करण्यासाठी उंदचन संच बसवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर चर्चा करताना मनसेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

किल्लेदार यावेळी म्हणाले की, हे काम ज्या कंत्राटदार संस्थेला दिले आहे. त्या संस्थेचे भाजपशी निकटचे संबंध आहेत. महापालिका अधिनियमानुसार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीला निविदा प्रक्रियेत भाग घेता येत नाही. मग या संस्थेला काम कसे दिले असा प्रश्न किल्लेदार यांनी उपस्थित केला. या कंत्राटदाराचे नाव आणि अधिक माहिती देण्याची मागणी केली असता भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याचा आरोपही किल्लेदार यांनी केला.

किल्लेदार यांनी प्रश्नांची सरबत्ती करताच अध्यक्ष प्रभाकर शिंदे म्हणाले की, ही कंत्राटदार संस्था २०१० पासून महापालिकेत काम करीत आहे. आता भाजपची सत्ता आल्यानंतरच हे नाव खटकले का असा सवाल त्यांनी केला. तसेच कंत्राटदार संस्था मराठी माणसाची असून मराठी माणसाने व्यवसाय करायचा नाही का असा सवाल करीत मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केला. मराठी माणसाने व्यवसाय करावा हा तुमच्या पक्षप्रमुखांचा सल्ला तरी ऐकावा असाही टोला अध्यक्षांनी लगावला.