आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबासह चार क्षण विरंगुळ्याचे घालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नववर्षांच्या स्वागताचा आनंद आपल्या कुटुंबासह-मित्रांसोबत द्विगुणीत करता यावा यासाठी ‘स्टार प्रवाह’वर ३१ डिसेंबरच्या उत्साह, जल्लोष, आनंदात भर घालण्यासाठी ‘ये रे ये रे १५’ हा नृत्य आणि संगीताचा कार्यक्रम होणार आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.
‘स्टार प्रवाह’च्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून आखण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये वाहिनीच्या कुटुंबातील जुने-जाणते आणि नवोदित कलाकार एकत्र येणार आहेत. दादासाहेब सरदेशमुख, आक्कासाहेब यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तिरेखांपासून ते नव्याने या परिवाराचे सदस्य झालेल्या रुंजी, रिषी या सदस्यांपर्यंत सर्वजण विविध नृत्याविष्कार सादर करणार आहेत. वयाने मोठे असलो, तरी आमच्यातला उत्साह, खेळकरपणा तरुणांनाही लाजवेल इतका आहे, हे दाखवून देण्यासाठी या कार्यक्रमाच्या दरम्यान मालिकांमधील ज्येष्ठ व्यक्तिरेखा तरुण कलाकारांसोबत रंगतदार खेळातही सहभागी होणार आहेत. तसेच लोकप्रिय विनोदवीरांचे कॉमेडी स्कीट्स आबालवृद्धांना पोट धरून हसायला भाग पाडतील, हे नक्की. सरत्या वर्षांचा निरोप घेताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ने आणलेल्या या मनोरंजनाच्या मेजवानीचा नक्कीच आनंद लुटा. ३१ डिसेंबरला रात्री ८ वाजल्यापासून हा कार्यक्रम ‘स्टार प्रवाह’वर पाहता येईल.