मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि शासकीय रुग्णालयांसाठी तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) प्रणाली अशा तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी ‘वर्षा’ येथे करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांसाठी सध्या ४० हून अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत.

या सर्व यंत्रणांमधील महत्त्वाची माहिती एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. माता व बाल आरोग्य, क्षयरोग नियंत्रण, असंसर्गजन्य आजारांची तपासणी यांसह विविध कार्यक्रमांमधील प्रमुख निर्देशांकांचे जिल्हानिहाय विश्लेषण या माध्यमातून करता येणार आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या तातडीने ओळखून संबंधित जिल्ह्याच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. आरोग्य विषयक माहितींचे केवळ संकलन न करता तिचा उपयोग लोकहितासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले.

एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून ‘१०४’ कॉल सेंटरचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या फोनबरोबरच आरोग्य विभागाकडून नागरिकांशी करण्यात येणाऱ्या संपर्काचे नियोजनही या केंद्रातून होणार आहे. अतिजोखमीच्या गर्भवती माता, प्रसूतीनंतरच्या माता, क्षयरुग्ण आणि असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांचा पाठपुरावा केला जाणार आहे. रुग्णालयातील सेवांबाबत नागरिकांचे अभिप्रायही घेतले जाणार आहे. दररोज सुमारे एक हजार कॉल हाताळण्याची क्षमता केंद्रात आहे. गंभीर प्रकरणांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ देण्याची यंत्रणाही तयार करण्यात आली आहे.

शासकीय रुग्णालयांतील सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी तारांकित मानांकन प्रणाली लागू करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रिया, स्वच्छता, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांचे अभिप्राय अशा विविध निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यमापन केले जाणार आहे. नागरिकांना घरबसल्या संबंधित रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळू शकणार आहे. नागरिकांनी दिलेल्या तक्रारी किंवा अभिप्रायावर जिल्हास्तरावर तातडीने कार्यवाही करण्याबरोबरच संबंधित नागरिकाशी पुन्हा संपर्क साधून सेवा प्रत्यक्ष मिळाली की नाही, याची खात्री केली जाणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ‘महा पल्स एआय’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १०४ शासकीय आरोग्य संस्था आणि १२ तालुक्यांना एकात्मिक डिजिटल प्रणालीशी जोडण्यात येणार आहे. आरोग्य सेवांचे निरीक्षण, संसाधनांचे व्यवस्थापन आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा पाठपुरावा अधिक प्रभावी होणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यावेळी उपस्थित होते.