मुंबई : एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होत होता आणि घराघरात लघु व कुटीर उद्योग होते. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्टअप ही लोकचळवळ व्हायला हवी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी येथे केले.

राज्यातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ हा कार्यक्रम ५ ते ९ मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रातल्या २४ स्टार्टअप धारकांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली. त्यामध्ये हेल्थटेक, एजटेक, ॲग्रीटेक, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था यांसारख्या क्षेत्रांतील स्टार्टअप्सचाही समावेश होता. मरीन टेक, दिव्यांग,ॲग्रीटेक, दिव्यांगाचे जीवन सुसह्य करणारी एआय सांकेतिक भाषा, कृषी रोबोटिक्स, प्रगत नॅनो बबल तंत्रज्ञानाद्वारे जल उपचार व शुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा, सौर पॅनल्सवर नॅनो कोटिंगद्वारे कार्यक्षमतेत वाढ, एआय प्रणालीद्वारे रस्त्याच्या स्थितीचे रिअल-टाइम विश्लेषण व खड्ड्यांचे शोध, दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना सक्षम करण्यासाठी स्मार्ट व्हिजन चष्मे, स्वच्छ ऊर्जा (ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे), कचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमी (पर्यावरण जैवतंत्रज्ञान), माती, पाणी व शेती स्वच्छ व सुधारण्यासाठी पर्यावरणपूरक बायोटेक सोल्युशन, जलद जखम भरून काढण्यासाठी न चिकटणारी, शोषणक्षम वॉऊंड ड्रेसिंग उत्पादने, तीव्र थंडावा देणारी जॅकेट, सेफ्टी हेल्मेट कुलर, हायपर कूलिंग टॉवेल, आदी क्षेत्रातील हे स्टार्ट अप्स आहेत.