मुंबई: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २७ फेब्रुवारीपासून येथे सुरू होणार असून अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर करणार आहेत. फडणवीस यांच्या पहिल्या अर्थसंकल्पाबद्दल राजकीय तसेच उद्योग क्षेत्रातही उत्सुकता आहे.
विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हे अधिवेशन चार आठवडे चालविण्याचाही निर्णय घेण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष अॅड्. राहुल नार्वेकर आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात पार पडली. त्या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते. बैठकीत २७ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणाऱ्या विधान परिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी ‘वंदे मातरम्’नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत वाजवण्यात येणार आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८मार्च रोजी दोन्ही सभागृहांत याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. अधिवेशनात १३ विधेयके मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.
अधिवेशनाचा कालावधी वाढवा – अजित पवार
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विनंती विरोधी पक्षांनी केली होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी किमान पाच आठवडय़ांचे घ्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राज्यातील जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरिता अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी पवार यांनी केली.