मुंबई : मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना राज्य निवडणूक आयोगाच्या एका पत्राने मोठा गोंधळ निर्माण केला. मतदानाच्या ४८ तास अगोदर प्रचाराला बंदी असताना आता आयोगाने मात्र जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा दिल्याने नवा वाद निर्माण झाला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मात्र उमेदवारांना घरोघरी प्रचाराची कायदेशी मुभा असून मतदानाच्या दिवशीही मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटण्यास परवानगी असल्याचे सांगितले.

मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबत असतो. मात्र यावेळी उमेदवाराला या ४८ तासाच्या कालावधीत घरोघरी जाऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करण्याची मुभा असेल. हा नियम आधीपासूनच आहे. नव्याने कोणताही नियम तयार करण्यात आलेला नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर आदी राज्यातील २९ महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी गेल्या दोन आठवड्यापासून भाजप, शिंदे सेना, काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे आदी प्रमुख पक्षांनी आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा धुरळा उडवला. प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याची मुभा आहे. मात्र पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन प्रचार करता येणार नाही. त्याचप्रमाणे प्रचारात माईकचा वापर करण्यास मनाईआहे. तर इलेक्ट्रॉनिक मिडिया व एसएमएसद्वारे प्रचारावर बंदीआहे. सर्व महापालिका आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा मुद्दा नवीन नाही. सन २०१२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होत असून कायद्यातच तशी तरतूद असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.