मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीत मनमानी पध्दतीने काम करणाऱ्या काही वादग्रस्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाने आता या अधिकाऱ्यांना अभय देण्याची भूमिका घेतली आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे तूर्त कोणताही निर्णय न घेण्याचे धोरण आयोगाने स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभाग क्रमांक २२५,२२६,२२७ मधील निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करु दिले नाहीत अशी तक्रार जनता दल आणि आम आदमी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती.

 अशाच प्रकारे ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेतील काही निवडणूक निर्णयअधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रिये दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत केली. आक्षेप घेण्यासाठी त्यांचे अर्ज उपलब्ध करुन दिले नाहीत तसेच आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज किरकोळ त्रुटी दाखवून फेटाळण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. या आरोपांची दखल घेत निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बाबत महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला होता.

 त्यानुसार पालिका आयुक्तांना काही दिवसांपूर्वी आपला अहवाल आयोगास पाठविला. त्यात राजकीय दबावापोटी उमेदवारी अर्ज नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची कृती अयोग्य असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्तांनीही आपला अहवाल आयोगास सादर केला आहे. सुरुवातीस या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची भूमिका घेणाऱ्या निवडणूक आयोगाने आता मात्र सबंधित अधिकाऱ्यांना अभय देण्याची भूमिका घेतली आहे. निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्यावर असताना या अधिकाऱ्यांना पदावरुन दूर केल्यास नव्या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पुढे पार पाडणे अडचणीचे होईल. त्यामुळे तूर्तास निवडणूक प्रक्रियेत ह्स्तक्षेप न करता या अधिकाऱ्यांना अभय देण्याची भूमिका आयोगाने घेतली असून सध्या हे अहवाल बाजूला ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे छाननीच्या वेळी किरकोळ कारणे दाखवून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेल्या काहींनी थेट उच्च न्यायालायत याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या शुक्रवारी उच्च न्यायालायत सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते याकडेही आयोगाचे लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत राज्य निवढणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता,

मुंबई महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्याबाबत महापालिका आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आता महापालिका निवडणूक निरीक्षकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल.