मुंबईः मुंबई वगळता राज्यातील महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत मतदरांकडून त्याच्या प्रभागातील पात्र उमेदवारांना मतदान करण्यास होणारा विरोध आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेत होणारा गोंधळ आणि विलंब टालण्यासाठी यावेळी मतदानाच्यावेळी मतदान यंत्र (ईव्हीएम)वरील ईएनडी( END) बटण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार एकाद्या मतदारांने पसंतीच्या उमेदवाराला किंवा यापैकी एकही नाही (नोटा) मत देण्यास नकार दिल्यास मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्राधिकाऱ्याने उपस्थित मतदान प्रतिनिधींसोबत नोटाचे बटन दाबून ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश आयोगाने दिले आहेत.
राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता अन्य निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत निवडणूक घेतली जाते. त्यानुसार प्रत्येक मतदाराला प्रभागाप्रमाणे चार ते पाच मते देण्याचा अधिकार आहे. या तरतुदींचा विचार करुन राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरीता विकसीत केलेल्या मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर शेवटचे (१६ वे बटण) END बटण ठेवले आहे.
आयोगाने डिसेंबर, २०२२ च्या आदेशान्वये मतदान यंत्रावरील END बटण कशाप्रकारे वापरण्यात येईल याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार एकाद्या मतदाराने त्याच्या प्रभागात पाच उमेदवारांना मते देणे अभिप्रेत असनाही केवळ दोन उमेदवारांना मते दिल्यास जोवर ईव्हीएमवर पाच मते किवा नोटा बटन दाबले जात नाही तोवर मतदान प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव मतदान केंद्राधिकाऱ्याच नोटाचे किंवा END बटनाचा वापर करुन ही पक्रिया पूर्ण करावी लागत असे. त्यामुळे END बटणाचा वापर करुन निवडणुका घेताना स्थानिक पातळीवर येणाऱ्या विविध अडचणी आणि मतदानास होणारा विलंबाबाबतग क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत या महापालिका निवडणुकीत END बटण पांढऱ्या मास्किंग टॅबने बंद करावे असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
तसेच ज्यावेळी मतदार मतदान कक्षात आल्यानंतर आपले मतदान पूर्ण करणार नाहीत अथवा कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसली तरी वरीलपैकी एकही नाही (NOTA) या पर्यायासमोरील बटण दाबण्याससुध्दा नकार देतील, त्याठिकाणी मतदान यंत्र पुढील मतदाराच्या मतदानासाठी सज्ज ठेवण्यासाठी आयोगाने पुढीलप्रमाणे प्रक्रिया सूचविली आहे.
एकादा मतदार आपले मतदान पूर्ण न करता मतदान कक्षामधून बाहेर निघाला तर मतदान अधिकारी/मतदान केंद्राध्यक्ष यांना कंट्रोल युनिटवरील लाल दिवा न विझल्यामुळे व बिप साऊंड न वाजल्यामुळे मतदाराने, मतदान पूर्ण केले नाही ही गोष्ट लक्षात येईल.अशा परिस्थितीत मतदान केंद्राध्यक्षांनी संबंधित मतदाराला त्याचे मतदान पूर्ण न झाल्याबाबतची कल्पना देऊन पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन अथवा बरीलपैकी एकही नाही (NOTA) या पर्यायासमोरील बटन दाबून मतदान पूर्ण करण्याबाबत विनंती करावी.
मात्र त्यानंतरही मतदाराने मत देण्यास अथवा नोटा या पर्यायासमोरील बटन दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्राध्यक्षांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांच्या नावासमोरील दिवे एखादा पुठ्ठा अथवा पुस्तक ठेवून झाकावेत. त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले आहे, त्या मतपत्रिकेवरील नोटा या पर्यायासमोरील बटण दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ही प्रक्रिया करताना मतदाराने केलेल्या मतदानाची माहिती कोणालाही होणार नाही, याची पुरेशी खबरदारी घ्यावी असे या आदेशात म्हटले आहे.
