मुंबई: मुंबई वगळता राज्यातील कोणत्याही महापालिकेत मतमोजणीसाठी ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर केला जाणार नाही. केवळ मुंबई महापालिकेत मतमोजणीच्या वेळी तांत्रिक अडचण निर्माण झाली तरच अपवादात्मक बाब म्हणून पाडूचा वापर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेने याची सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना कल्पना दिली होती, असे स्पष्ट करून राज्य निवडणूक आयोगाने ‘पाडू’ बाबत ठाकरे बंधूंचे सर्व आरोप फेटाळून लावले.
शिवसेना(ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पुन्हा एकदा निवडणूक प्रचार आणि मतमोजणीसाठी पाडू यंत्र वापरण्यावरुन निवडणूक आयोग केवळ सरकारसाठी काम करीत असल्याचा आरोप केला.
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच आयोगाने आता एक पाडू नावाचे नवीन यंत्र आणले आहे. ते उद्या सगळीकडे ठेवले जाणार आहे. ईव्हीएम बंद पडले, तर हे मशीन वापरले जाणार आहे. पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिली नव्हती. ईव्हीएमला नवे मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही अशी विचारणा करीत आयोगाच्या कारभारावर राज ठाकरे यांनी टीका केली.
निवडणूक आयोगाने मात्र ठाकरे बंधूंचे आरोप फेटाळून लावले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आली तरच ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची केला जाईल. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तसेच मुंबई वगळता अन्य कोणत्याही पालिकेत याचा वापर होणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या पाडूचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम3ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादात्मकरीत्या पाडूचा वापर करावा, असे आदेश आयोगाने पालिकेस दिले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी १४० पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास बेल कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर केला जाणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाडूबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. त्यामुळे ठाकरे बंधूंचे आरोप निराधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच प्रचाराची वेळ संपल्यानंतर घरोघरी प्रचार करण्याचा नियमही जुनाच असून आयोगाने त्यात कोणताही बदल केलेला नसल्याचेही आयोगातील सूत्रांनी सांगितले.
