विदर्भातील वाळू ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातील टायपिस्टला पोलिसांनी अटक केली आहे. महेश सावंत असे या आरोपीचे नाव असून त्याने ठेकेदाराकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर मंत्रालयामार्फत कारवाई करायला लावू अशी धमकी तो संबंधीत ठेकेदाराला देत होता.  याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मिड डे’ ने दिलेल्या वृत्तानुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयात महेश सावंत (वय ३८) हा टायपिस्ट म्हणून काम करत होता. कार्यालयात काम करत असताना महेश सावंतने विदर्भातील एका वाळू ठेकेदाराचा नंबर मिळवला.  कार्यालयातील सर्व कर्मचारी घरी गेल्यावर महेश सावंतने संबंधीत वाळू ठेकेदाराला फोन केला. दोन महिन्यांपासून तो ठेकेदाराकडे पैसे मागत होता. १० लाख रुपये द्यावे अन्यथा पर्यावरण मंत्र्यांना सांगून कारवाई करायला लावेन अशी धमकी तो वाळू ठेकेदाराला देत होता. रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन तो धमकी देत होता. या सर्व प्रकारावर संशय आल्याने संबंधीत ठेकेदाराने चौकशीला सुरुवात केली. मुंबईत आल्यावर त्याने या प्रकाराची माहिती रामदास कदम यांच्या स्वीय सहाय्यकांना दिली. आपल्या कार्यालयातील कर्मचारी खंडणी मागत असल्याचे समजताच रामदास कदम यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

रामदास कदम यांच्या स्वीय सहाय्यकाने याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी महेश सावंतला अटक केली. पोलिसांनी सावंतचा फोन टॅप केला असून यात तो ठेकेदाराला धमकावत असल्याचे उघड झाले आहे.