मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्य महोत्सव गणेशोत्सव’निमित्त गणेशोत्सवावर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या विशेष टपाल तिकिटाच्या अनावरणाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेला राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करणे हा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा टपाल तिकिटाच्या माध्यमातून विशेष स्थान देण्यात आले आहे. गणेशोत्सवातील भक्ती, कला, सामाजिक सहभाग आणि सार्वजनिक उत्सवाची परंपरा या माध्यमातून देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व नवतंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष बाजीराव शेलार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत संगीता कैलास खेडेकर तसेच महाराष्ट्र पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र किसन जयभाये यांचीही उपस्थिती राहणार आहे.
विशेष टपाल तिकिटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा, सार्वजनिक सहभाग आणि सांस्कृतिक वारसा यांना राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. टपाल तिकिटे ही केवळ पत्रव्यवहाराचे माध्यम न राहता देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दस्तऐवजीकरण करणारे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त जारी होणारे हे विशेष टपाल तिकीट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची नोंद घेणारे ठरणार आहे.‘राज्य महोत्सव गणेशोत्सव’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी नागरिकांना स्नेह निमंत्रण देण्यात आले असून, कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.
