मुंबई: सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने भाडेवाढ करावी, या मागणीसाठी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांसदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत दहा दिवसांत भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. या आश्वासनानंतर मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने तूर्तास संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट

मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुंबई महानगरातील विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांो ३० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून ए. एल. क्वाड्रोस आणि मुंबई ऑटोरिक्षा – टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव उपस्थित होते. बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सीच्या व्यवसायासाठी वापरण्यात येणारा सीएनजी गॅस ४० टक्के अनुदानित दराने देण्यात यावा आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत रिक्षा व टॅक्सीच्या भाडेदरात खटुआ समितीच्या शिफारशीवर आधारित अंतरिम वाढ देण्यात यावी, राज्यातील ऑटोरिक्षाचे मुक्त परवाना वाटप धोरण बंद करण्यात यावे, रिक्षाचालक – मालक यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, महाराष्ट्रातील अवैध वाहतूक रोखण्याकरिता प्रत्येक जिल्हा निहाय एक भरारी पथक नेमण्यात यावे यासह अन्य मागण्या बैठकीत करण्यात आल्या. त्यावर चर्चा करुन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले. भाडेवाढीवर झालेल्या चर्चेत दहा दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे सामंत यांनी बैठकीत स्पष्ट केले. या आश्वासनानंतर मुंबई टॅक्सीमेन्स युनियने तूर्तास संप पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले.