मुंबई : राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी मोठी संधी उपलब्ध असून त्या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचा भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. तसेच दुर्गम भागात कमी कालावधीत पर्यटनस्थळाच्या विकासात जलपर्यटन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गोसीखुर्द जलाशय आणि आसपासच्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पातून स्थानिक तरुणांसाठी ८० टक्के रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पातील जलपर्यटन विकासाबाबत सामंजस्य करार झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या सामंजस्य कराराद्वारे, पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत पद्धतीने जलपर्यटन निर्माण होईल. राज्याच्या दुर्गम भागातील स्थानिक समुदायांच्या सामाजिक – आर्थिक विकासासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. मेघदूत निवास्थानी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, प्रधान सचिव सौरभ विजय, आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.
या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्पाची माहिती, पायाभूत सुविधा, जलपर्यटन, पर्यटक व वाहतुकीची अंदाजित संख्या, प्रकल्पाचे फायदे आदींविषयी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते यांनी माहिती दिली.