मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात असताना त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाचा गौरव करीत  राजभवनातील ब्रिटिशकालीन तळघरे (बंकर्स) गेल्या ७० वर्षांत सापडली नाहीत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लगावला. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारवर टोलेबाजी केली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजभवन येथे क्रांती गाथा या स्वातंत्र्यलढय़ातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले. ही ब्रिटिशकालीन भुयारे २०१६ मध्ये आढळून आली होती. दारूगोळा व अन्य सामग्री साठवण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. इतिहासकार आणि लेखक डॉ. विक्रम संपत यांच्या संकल्पनेतून क्रांती गाथा दालन तयार करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘जल भूषण’ या राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान असलेल्या इमारतीचेदेखील उदघाटन करण्यात आले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यलढय़ात लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, अनेक क्रांतिकारक यांनी आपल्या मार्गाने योगदान दिले.  स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसच्या माध्यमातून मोठे कार्य केले. त्यांचे निधन १९३० मध्ये झाले.  अस्थी जतन करून ठेवाव्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात आणाव्यात, असे त्यांनी सांगितले होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे काम कोणी केले नाही. त्यासाठी ७३ वर्षे जावी लागली, असे सांगत काँग्रेसवर शरसंधान केले. त्यांच्या अस्थी मी २००३ मध्ये देशात आणल्या आणि गुजरातमध्ये नेवून तेथे इंडिया हाऊसची उभारणी केली.

राज्यपालांची टीका

  औरंगाबादमध्ये चार-पाच दिवसांनी पाणी येते, अशी तक्रार नागरिकांनी मी तेथे गेल्यावर केली होती. राज्यात गेली दोन वर्षे वैधानिक विकास मंडळे कार्यरत नाहीत. पण सिंचन अनुशेष तपासण्याची माझ्यावर सांविधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी आढावा घेतला. तेव्हा अनेक सिंचन योजना गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत आहेत. ‘मोदी है, तो मुमकीन है, ’ असे बोलले जाते. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेवून या सिंचन योजना पूर्ण कराव्यात आणि जनतेचे पाण्यावाचून होत असलेले हाल दूर करावेत, असे सांगत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली.  

‘अनिच्छेनेच महाराष्ट्रात’

पंतप्रधान मोदी यांनी मला इच्छा नसताना मोठय़ा विश्वासाने महाराष्ट्रात पाठविले, असे कोश्यारी यांनी मोदींच्या उपस्थितीतच सांगितले. महाराष्ट्र हा सुंदर प्रदेश आहे, इथे समुद्र आहे. मी उत्तराखंडचा आहे. तेथे हिमालय आहे, पण समुद्र नाही. मात्र येथे हिमालय नाही, अशी टिप्पणी कोश्यारी यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजभवनातील दालन हे प्रेरणादायी तीर्थस्थळच ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.