जर्मनीच्या दौऱ्यावर निघण्याआधी तब्बल ३७ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले. मुंबईतील वाढती गुन्हेगारी आणि उपराजधानी नागपूरमधील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची गंभर दखल घेऊन सनदी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट करण्यात आला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक व तुरुंग महानिरीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख हिमांशू रॉय यांना पोलीस गृहनिर्माण महामंडळावर पाठवून मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलास धक्का दिला आहे. या पथकाचे प्रमुख पद विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या व काहीशा कमी महत्त्वाच्या जागेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागरी संरक्षण विभागाचे अप्पर महासंचालक व्ही. डी. मिश्रा यांच्याकडे पोलीस आस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच राज्यासाठी आणखी एक महासंचालक (विधी व तंत्रज्ञान) आणि मुंबईसाठी स्वतंत्र सहआयुक्त (आर्थिक गुन्हे) अशी दोन नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, त्याचे प्रमाण वाढले पाहिजे, त्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या महासंचालक (विधी व तंत्रज्ञान) पदावर पुण्याचे आयुक्त सतीशचंद्र माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, धनंजय कमलाकर यांच्यावर आर्थिक गुन्हे विभागाच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नागपूरमध्ये अलीकडेच काही गंभीर गुन्ह्य़ाच्या घटना घडल्या. तुरुंगामधून पाच कैदी पळून गेल्यामुळे खळबळ उडाली होती. त्याची गंभीर दखल घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त पाठक यांची पुण्याच्या आयुक्तपदी पाठवणी करण्यात आली. एस. पी. यादव यांची नागपूरचे नवे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूरचे तुरुंग महानिरीक्षक शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्र सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ही शिक्षा असल्याचे मानले जाते. नागपूरचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांचीही मुंबईत सहआयुक्तपदावर (प्रशासन) बदली करण्यात आली आहे. रेल्वेचे अप्पर पोलीस महासंचालक संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदावर बदली करण्यात आली आहे.

विवेक फणसाळकर एटीएसचे प्रमुख
’एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांची महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळावर अप्पर महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. एटीएसच्या प्रमुखपदाची जबाबदारी आता सहआयुक्त (प्रशासन) विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

’एसीबीचे पोलीस उपमहानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देऊन त्याच पदावर ठेवण्यात आले आहे.

’अप्पर महासंचालक (नियोजन व समन्वय) हेमंत नगराळे यांची म्हाडाच्या अप्पर महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रज्ञा सरवदे यांना अप्पर पोलीस महासंचालकपदावर बढती देऊन सिडकोच्या दक्षता अधिकारीपदावर कायम ठेवण्यात आले आहे.