सध्या राज्याला अन्न सुरक्षेची नव्हे, तर शिक्षण सुरक्षेची गरज आहे. शिक्षणाच्या जोरावर गरीब व्यक्तीही त्याच्या अन्नाची व्यवस्था स्वत: करू शकतो, असे मत ‘लोक भारती’चे आमदार कपिल पाटील यांनी शनिवारी मुंबईत केले. के.जी.पासून पदवीत्तपर्यंतचे शिक्षण मोफत करा यासाठी लोक भारतीने प्लाझा सिनेमापासून ते माहीम चौपाटीपर्यंत ‘वॉक फॉर फ्री एज्युकेशन रॅली’चे आयोजन केले होते.
या रॅलीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. ‘‘सध्याचे मुख्यमंत्री हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. पण तेवढे पुरेसे नाही. शिक्षणाच्या बाबतीत जर निर्णय घेणार नसतील तर तसे मुख्यमंत्री आम्हाला नको. यावेळी विरोधकांवरही त्यांनी चांगलाच हल्लाबोल चढविला. सत्ताधारयांच्या धोरणाविरोधात विरोधकांची साथ मिळेल, अशी इच्छा होती. मात्र ते सुध्दा महायुती करण्यात व्यस्त आहेत. यावेळी शिक्षणाचा प्रश्न राजकीय अजेंडावर आणण्यासाठी नव्या राजकीय पर्यायाची उभारणी करणार आहे, असे कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले.  
शिक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी १० फेब्रुवारीपासून परळ येथील कामगार मदानात उपोषणावर बसणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. आघाडी आणि महायुती यांच्यामुळे मध्यमवर्गीयांना शिक्षणाचे दरवाजे खुले होणार नसेल, तर जनतेमध्ये नवा राजकीय पर्याय आपण उपलब्ध करणार आहोत. या माध्यमातून नव्या राजकीय पर्याय जनतेमध्ये नेऊन पर्यायी राजकीय ताकद उभी करील आणि प्रस्थापित राजकारणाचा चेहरा बदलून टाकेल, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर, अ‍ॅड वर्षां देशपांडे, अमोल ढमढेरे, प. म. राऊत यांनी शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवत घणाघाती भाषणे केली.
अण्णा हजारेंना ‘भारतरत्न’ द्या
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी भ्रष्टाचार विरोधी अनेक आंदोलन झाली. या आंदोलनामुळेच केंद्राला लोकपाल कायदा मंजूर करावा लागला. त्याआधी माहिती अधिकाराचा कायदा अण्णांमुळेच प्रथम महाराष्ट्रात नंतर केंद्र सरकारला करावा लागला. अण्णांमुळेच हा क्रांतीकारी बदल देशात झाला असून जर भ्रष्टाचाराच हे पाप सरकारला धुवायचे असेल तर केंद्र सरकारने अण्णांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा, अशी मागणी लोक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शनिवारच्या
सभेत केली.