मुंबई : राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती असून राज्य अराजकतेकडे जात आहे, अशी टीका भाजप आमदार आशीष शेलार यांनी सोमवारी केली. किरीट सोमय्या यांच्या पोलिसांनी केलेल्या स्थानबद्धतेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी के ली.

 ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला जात होते. पण सोमय्या यांना दुपारी मुलुंड येथील घरी सुमारे चार तास व सायंकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रोखण्यात आले. पोलिसांशी हुज्जत घातल्यावर कोल्हापूरला जात असताना कऱ्हाडला उतरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेश बंदीच्या आदेशावर मुंबई पोलिसांची कारवाई आणि नोटीस सायंकाळी बजावली असताना आधीपासूनच रोखण्याचे पोलिसांचे प्रयत्न बेकायदेशीर होते. मुख्यमंत्री कार्यालयास काहीच माहिती नसल्याचे सांगितले जाते, हे संशयास्पद असल्याने या घटनेची चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली.  बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी जाणाऱ्या करुणा शर्मा यांना पिस्तूल बाळगल्याबद्दल बनाव रचून अटक होते, सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात पाठविले जाते असा आरोप केला.