|| निलेश अडसूळ

प्रयोगांअभावी निर्वाहाचा मुख्य मार्ग बंद; सरकारकडून मदतीची अपेक्षा

मुंबई : मुंबई-पुण्यात जन्माला येणारे नाटक राज्यभरात पोहोचवण्याचे काम जिल्ह्य़ातील, गावांतील स्थानिक व्यवस्थापक करतात. मधल्या काळात नाटक सुरू झाले, पण अल्पावधीतच त्यावर पडदा पडल्याने नाटक दोन प्रमुख शहरांच्या सीमा ओलांडू शकले नाही. परिणामी वर्षभरात ग्रामीण भागांत नाटकाचे प्रयोगच झाले नसल्याने तेथील व्यवस्थापकांची आणि त्यांच्या मदतनीसांची आर्थिक कोंडी झाली आहे.

नाटक बंद झाल्याने अर्थार्जनासाठी काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू केले; परंतु केवळ नाटकावर चरितार्थ चालवणाऱ्या रंगकर्मीना सरकारने मदतनिधी द्यावा, अशी मागणी या व्यवस्थापकांनी केली आहे.

मराठी नाटक आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न शहरांच्या कक्षेत रंगत असले तरी त्याच्या सीमा राज्यभर रुंदावण्यासाठी गावोगावचे व्यवस्थापक राबत असतात. त्यांच्यामुळेच कानाकोपऱ्यात नाटक पोहोचते आणि रंगकर्मीना दाद मिळते. अत्यंत मेहनतीने राबणारा आणि रंगकर्मीसाठी आडगावात सुकर व्यवस्था उभारणारा हा वर्ग उपेक्षित असतो; पण त्यांचा उदरनिर्वाह या कलेवर अवलंबून असतो. गेल्या टाळेबंदीत गाठीशी असलेल्या पैशावर त्यांनी काही प्रमाणात वेळ निभावून नेली, पण डिसेंबरअखेरीस पुन्हा पडदा उघडल्यानंतर नाटक ग्रामीण भागातही येईल, अशी आशा धरून बसलेल्या व्यवस्थापकांच्या पदरी नव्याने लागू झालेल्या र्निबधांमुळे निराशा पडली आहे.

मदतनीस मजुरीवर..

‘प्रयोगांची आखणी, तिकीटविक्री, प्रयोगाची पूर्वतयारी यासाठी तीन ते चार व्यक्ती मदतनीस म्हणून आमच्यासोबत काम करतात. आमचेच काम बंद झाल्याने त्यांना वेतन कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न आहे. सुरुवातीचे काही महिने आम्ही तो दिलाही; पण आता मात्र आर्थिक भार पेलणे शक्य नसल्याने मदतनीस म्हणून काम करणाऱ्या रंगकर्मीनी नाटक सोडून इतरत्र मजुरीची वाट धरली आहे,’ असे कोल्हापूर येथील व्यवस्थापक गिरीश महाजन यांनी सांगितले.

पर्यायांचा शोध..

गेल्या टाळेबंदीत काही महिने गाठीशी शिल्लक असलेल्या पैशांवर खर्च भागवला. पुढे रोजचा खर्च जुळवणे अवघड झाल्याने पोळीभाजी केंद्र सुरू केले. काही व्यवस्थापकांनी दूध, भाज्या, तर काहींनी किरकोळ वस्तू-साहित्यविक्रीची दुकाने सुरू केली. आमची अवस्था मुंबई-पुण्यातील कलाकारांपेक्षा बिकट आहे, असे औरंगाबादचे व्यवस्थापक संदीप सोनार यांनी सांगितले.

..तर कर्जबाजारी होऊ!

काही व्यवस्थापक ग्रामीण भागात नाटकापलीकडे लावणीचेही कार्यक्रम आयोजित करतात, परंतु करोनामुळे कोणतेही प्रयोग होऊ शकले नाहीत. या काळात दुसरा व्यवसाय सुरू करणे ही आर्थिक जोखीम आहे. आणखी काही महिने अशी स्थिती राहिली तर कर्ज काढून जगायची वेळ येईल. त्यामुळे वर्षांनुवर्षे नाटकावर उपजीविका करणाऱ्या रंगकर्मीना आर्थिक मदत देऊन सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी व्यवस्थापकांनी केली.

चाळीस वर्षांहून अधिक काळ मी नाटय़ व्यवसायावर जगत आहे. वर्षभर नाटक थांबल्याने कुटुंबाची आर्थिक ओढाताण झाली. आता माझे वय साठीपार गेल्याने दुसरा व्यवसाय करणे शक्य नाही. त्यामुळे नाटकाकडे डोळे लावून बसणे एवढेच माझ्या हाती आहे. – राजेंद्र जाधव, नाटय़ व्यवस्थापक, नाशिक