मुंबई : दाऊद इब्राहिमचा साथीदार ‘सलीम कुत्ता’ याचा ‘मित्र’ असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावर करणाऱ्या भाजपनेच त्यांना पक्षात प्रवेशदिला आहे. विशेषम्हणजे स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध डावलून मंगळवारी सन्मानाने पक्षाची शाल त्यांच्या गळ्यात घालण्यात आली.
बडगुजर यांची सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीत नाचल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यावर नितेश राणे, दादा भुसे व अन्य नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. विधानसभेतही सलीम कुत्ता व बडगुजर यांच्या संबंधांचा मुद्दा उपस्थित करून आरोप करण्यात आले. बडगुजर हे त्यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) शहरप्रमुख होते. ‘बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असलेले नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कसे चालतात,’ असा सवाल राणे यांनी विधानसभेत केला होता. बडगुजर यांच्या कथित नाचगाण्याच्या पार्टीची विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) तपासणी करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. कालबद्ध चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र पुढे चौकशीचे काहीच झाले नाही. बडगुजर हे महाजन यांच्या संपर्कात राहिले आणि आता भाजपवासी झाले.
‘त्या’ छायाचित्रामागे बडगुजर ?
बावनकुळे सुट्टीसाठी मकाऊ येथे गेले असताना एका कॅसिनोत खेळतानाचे त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर गदारोळ झाला होता. हे छायाचित्र बडगुजर यांनीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे दिल्याची चर्चा होती. त्यामुळे बावनकुळे यांचा बडगुजर यांच्या भाजप प्रवेशास विरोध होता. भाजप आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात बडगुजर यांनी निवडणूक लढविली होती आणि अतिशय खालच्या स्तरावर जाऊन प्रचार व भांडणे झाली होती. त्यामुळे हिरे यांचाही बडगुजर यांच्या पक्षप्रवेशास टोकाचा विरोध होता.
सकाळी अनभिज्ञ, दुपारी प्रवेशाला हजर
बडगुजर यांचा पक्षप्रवेश प्रदेश कार्यालयात बावनकुळे, चव्हाण व महाजन यांच्या उपस्थितीत दुपारी झाला. पण बावनकुळे व चव्हाण यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची कल्पना नसल्याचे सांगितले होते. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्यावर विरोधाची भावना तयार होते. विधानसभा निवडणुकीला सहाच महिने झाले असून नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे. भाजपमध्ये स्थानिक नेत्यांचे एकमत झाल्याशिवाय नेत्यांचा प्रवेश होत नाही, असे बावनकुळे यांनी सकाळी पत्रकारांना सांगितले होते. मात्र भाजपमधील संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांनी पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे पक्षप्रवेशाला विरोध केलेल्या बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण यांचाही नाईलाज झाल्याचे सांगितले जाते.
‘दाऊदलाही पक्षात घेतील’
बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस व अन्य पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. आता कुख्यात दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि अन्य गुंडही भाजपमध्ये येतील, असा टोला खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
बबनराव घोलपही भाजपमध्ये
सुधाकर बडगुजर यांच्याबरोबर चर्मोद्याोग गैरव्यवहारात तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झालेले माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्यासह माजी महापौर अशोक मूर्तडक व अन्य काही नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत (उद्धव ठाकरे) असलेले घोलप हे १९९५ च्या युती सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्यावर आरोप झाल्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी घोलप यांच्यावर कारवाईसाठी आंदोलन केले होते.