जुलै-ऑगस्टच्या तुलनेत मोठी घट, मुंबईत मात्र काहीशी वाढ

मुंबई : जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेने राज्यातील सप्टेंबरच्या घरविक्रीत मोठी घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात ९६ हजार ७४० घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला १ हजार ६२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मुंबईतील घरविक्री मात्र ऑगस्टच्या तुलनेत काहीशी वाढली आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत ७ हजार ७१६ घरे विकली गेली असून यातून ५२४ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने मिळाला आहे.

करोनाचे संकट अजूनही कायम असले तरी आता बांधकाम क्षेत्रातील आणि मालमत्ता बाजारपेठेतील व्यवहार हळूहळू सुरळीत होऊ लागले आहेत. नवीन प्रकल्प सुरू होत असून चालू प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्याकडे विकासकांचा कल आहे. या पाश्र्वभूमीवर घरविक्री आणि महसुलात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना मागील तीन महिन्यांपासून घरविक्री घटत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये घरविक्री घटली आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कागदपत्रानुसार संपूर्ण सप्टेंबर महिन्यात ९६ हजार ७१६ घरे विकली गेली असून यातून १ हजार ७२३ कोटींचा महसूल मिळाला आहे. जुलै महिन्यातील घरविक्रीची आकडेवारी १ लाख ३६ हजार अशी होती, तर ऑगस्टमध्ये १ लाख ४ हजार ५६ घरे विकली गेली होती. जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घरविक्रीत घट दिसून येत आहे.

मुंबईतील घरविक्री मात्र ऑगस्टच्या तुलनेत काहीशी वाढली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईत ७ हजार ७१६ घरांची विक्री झाली होती आणि यातून ५२४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जुलैमध्ये विक्री झालेल्या घरांचा आकडा ६ हजार ७८४ असा होता आणि यातून ४२० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. म्हणजेच सप्टेंबरमध्ये घरविक्री साधारणत: १ हजारांनी वाढली आहे. तर महसूलही १०० कोटी रुपयांहून अधिक वाढला आहे.

पितृ पंधरवड्याचा फटका : विकासक

करोनाचा फटका घरविक्रीला आजही काही प्रमाणात का होईना पण बसत आहे. पण सप्टेंबरमध्ये घरविक्रीत झालेल्या घटीला पितृ पक्ष पंधरवडालाच मुख्य कारणीभूत असल्याचे राजेश प्रजापती, संस्थापक अध्यक्ष, क्रेडाय-एमसीएचआय, रायगड शाखा यांनी सांगितले. २० ऑगस्टपासून पितृ पंधरवडा सुरू झाला आहे. आजही मोठ्या संख्येने लोक पितृ पक्षात घर खरेदी वा नोंदणीसारखे व्यवहार करत नाहीत. याचाच फटका बसल्याने सप्टेंबरमध्ये राज्यातील घरविक्री घटली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर आता दसरा-दिवाळी येणार असून या काळात घरांची मागणी वाढते. त्यामुळे या संधीचा फायदा घेत घरविक्री वाढावी यासाठी मुद्रांक शुल्क दरात कपात करावी ही आमची मागणी कायम आहे. ही मागणी मान्य झाल्यास नक्कीच दिवाळीत घरविक्री वाढेल. तेव्हा राज्य सरकारने यावर विचार करावा अशी मागणी ही त्यांनी केली.