मुंबई : मराठी संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा गौरव अधोरेखित करणाऱ्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून आता महानगरपालिका सभागृहात घुमणार आहे. याबाबत नगरसेविका व शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी गुरुवारी सभागृहात ठरावाची सूचना मांडली. महापौर रितू तावडे यांनी या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिली.

महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात गुरुवारी सर्वसाधारण मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध ठरावाच्या सूचना सभागृहात मांडल्या. त्यात राजेश्री शिरवडकर यांनी राज्यगीताबाबत ठरावाची सूचना मांडली. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असून हे गीत ऐकताच महाराष्ट्रातील जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो.

शासन निर्णयानुसार, हे गीत शासकीय कार्यक्रमांमध्ये तसेच, सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठाचा अनिवार्य भाग करण्यात आल्यामुळे प्रत्येक मराठी मनात गर्जणारा अभिमानाचा नाद ठरत आहे. तसेच, प्रार्थनेसोबत विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, मराठी अस्मिता आणि संस्कृतीचे बीज रोवत आहे.

मराठी भाषेचे संवर्धन व सांस्कृतिक अस्मितेची जोपासना ह्यासाठी आणि मराठीचा सन्मान व संस्कृतीचा अभिमान अधिक दृढ होण्यासाठी कवी राजा बढे यांची ओजस्वी शब्दरचना आणि शाहीर साबळे यांच्या आवाजाने लयबद्ध केलेले हे गीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे शिरवडकर म्हणाल्या.

तसेच, ही वस्तुस्थिति लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सभागृहात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून वाजविण्यात यावी, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना राजेश्री शिरवडकर यांनी सभागृहात मांडली. महापौरांनी ही ठरावाची सूचना मंजूर केली.