मुंबई : स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागप्रमुखांकडून होत असलेला मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत डॉक्टर महिलेने राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर जे.जे. रुग्णालयाने अहवाल सादर केलेला नाही, तसेच सुनावणीदरम्यान भूमिकाही स्पष्ट न केल्याने आयोगाने जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांना नोटीस बजावली आहे.
जे जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील डॉक्टर महिलेने विभागप्रमुखाकडून सतत होत असलेला मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक याबाबत राज्य महिला आयोगाकडे १० जुलै २०२५ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने रुग्णालय प्रशासनाला १८ जुलै २०२५ आणि २४ ऑक्टोबर २०२५ असे दोन वेळा त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
मात्र रुग्णालय प्रशासनाने अहवाल सादर न केल्याने याची गंभीर नोंद घेत आयोगाने याप्रकरणी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यालयात सुनावणी घेतली. सुनावणीस रुग्णालय प्रशासनाच्या वतीने उपस्थित व्यक्तीस तक्रार आणि त्यावर रुग्णालयाने केलेली कार्यवाही याबाबत कुठलीही माहिती नव्हती. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना गांभीर्याने न घेणे आणि आयोगाने मागितलेली माहिती वेळेवर न देणे, सहकार्य न करणे या गंभीर मुद्द्यांची नोंद घेत आयोगाने डॉ. अजय भंडारवार यांना नोटीस बजावली.
रुग्णालय आस्थापनेकरिता स्थापित अंतर्गत समितीची (IC) संपूर्ण माहिती, तक्रारदार महिलेच्या तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणती दखल घेतली याबाबत सविस्तर अहवाल, तसेच तक्रार केलेल्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर पुन्हा महत्त्वाची जबाबदाली सोपविल्यामुळे ते पुन्हा अर्जदार डॉक्टर महिलेस मानसिक त्रास देत असल्याची बाब शासनाला अवगत केली का याचा सविस्तर खुलासा सात दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश आयोगाने जे. जे. रुग्णालयाला दिले आहेत.
यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर कळविण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात पुढील दोन दिवसात आयोगाला सविस्तर माहिती दिली जाईल, अशी माहिती डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.
