‘सागरा प्राण तळमळला’ या गीताला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त खास सोहळ्याचे आयोजन

मुंबई : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला आज ११५ हून अधिक वर्ष पूर्ण झाली असून या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून १२ डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे ‘सागरा प्राण तळमळला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे.

अंदमानमधील श्री विजया पुरम येथे मुंबईतील ‘व्हॅल्युएबल ग्रुप’च्या वतीने १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ‘सागरा प्राण तळमळला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बियोदनाबाद येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे संचालक अमेय हेटे यांची संकल्पना असलेला हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे. महाराष्ट्राचे सास्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार – लेखक डॉ. विक्रम संपत, अभिनेते शरद पोंक्षे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार, गायक पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबध्द केलेली ‘जयोस्तुते’, ‘जय जय शिवराया’, ‘हे हिंदू नृसिंहा’ अशी गाणी सादर केली जाणार आहेत.

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ या गाण्याचेही यावेळी विशेष सादरीकरण केले जाणार आहे. ‘हा सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरक इतिहासाला विनम्र अभिवादन आहे. पुढील पिढ्यांच्या मनामनात देशभक्तीची ठिणगी प्रज्वलित करण्याचा हा एक सशक्त प्रयत्न आहे’, असे अमेय हेटे यांनी सांगितले. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन मेराक इव्हेंटसच्या मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर करीत आहेत.