मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला सध्या कोणत्या स्थितीत आहे, आतापर्यंत किती साक्षीदार तपासले, आणखी किती तपासायचे आहेत, अशी विचारणा करून या सगळय़ाचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. खटल्यातील आरोपी समीर कुलकर्णी याच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. तसेच खटल्याची सद्य:स्थिती प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्यासाठी एनआयएला दोन आठवडय़ांची मुदत दिली.

खटल्याला अवाजवी विलंब झाला आहे आणि घटनेला १३ वर्षे उलटली तरी खटल्यात अद्यापही साक्षीदार तपासण्याची प्रक्रिया संपलेली नाही, असेही कुलकर्णीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्याबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्यानंतरही खटल्याची सुनावणी कूर्मगतीने सुरू असल्याचेही त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. एनआयए आणि खटल्यातील काही आरोपी खटल्याला विनाकारण विलंब करत असल्याचा आरोपही कुलकर्णी याने केला.