महिला वेटर कायद्याने घालून दिलेल्या वेळेपर्यंतच काम करतात की नाही यावर पाळत ठेवण्यासाठी रेस्टॉरंट किंवा बारबाहेर दिवस-रात्र पोलीस तैनात करण्याचा ठाणे पोलीस आयुक्तांचा निर्णय जनहितार्थ नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी या निर्णयाला स्थगिती दिली.  
महिला वेटर घालून दिलेल्या वेळेपर्यंतच काम करतात की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी रेस्टॉरंट वा बारबाहेर दोन पोलीस तैनात ठेवण्याच्या निर्णयाविरोधात ठाणे येथील ३६ रेस्टॉरंट आणि बारमालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने या फतव्यासाठी सरकारला फैलावर घेत या निर्णयाला स्थगिती दिली.