मुंबई : हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये हृदयविकाराचे तातडीने निदान आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ५० लाखांहून अधिक ईसीजी चाचण्या करण्यात आल्या असून त्यामधून ३४ हजारांहून अधिक स्टेमी रुग्णांचे तसेच १ लाख ४५ हजारांहून अधिक इतर गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत राज्यात ९९ हब (मुख्य) आणि २४१५ स्पोक (उपकेंद्र) आहेत. मुख्य केंद्रांमध्ये कॅथलॅब उपलब्ध असलेली ९९ रुग्णालये असून, यामध्ये खासगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये, धर्मादाय रुग्णालयांचा समावेश आहे, तर २,४१५ शासकीय उपकेंद्रे असून, यामध्ये जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
उपकेंद्रांमध्ये प्राथमिक पातळीवर ईसीजी तपासणी करून त्याचा अहवाल क्लाऊडवर अपलोड होतो. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने काही मिनिटांत ईसीजीचे विश्लेषण केले जाते. स्टेमीचे निदान झालेल्या रुग्णाला उपकेंद्रामध्ये सुविधा उपलब्ध असल्यास तातडीने थ्रोम्बोलायसिस उपचार देण्यात येतात. पुढील उपचारासाठी रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने संबंधित हब रुग्णालयात पाठविण्यात येते.
ग्रामिण भागातील रुग्णांना सर्वाधिक फायदा
मुख्य रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, बायपाससारख्या सुविधा उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना संबंधित उपचारांचा लाभ मिळतो. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने योग्य उपचार केंद्राशी जोडणे शक्य होत आहे. ईसीजी तपासणीला प्राधान्य हृदयविकाराचा संशय असलेल्या रुग्णाची तातडीने ईसीजी तपासणी करणे हा स्टेमी प्रकल्पातील महत्त्वाचा भाग आहे. छातीत दुखणे, छातीत दडपण येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे, मळमळ होणे किंवा वेदना जबडा, मान, खांदा अथवा हाताकडे जाणे अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
स्टेमी म्हणजे काय?
एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन ( स्टेमी ) हा हृदयविकाराच्या झटक्याचा गंभीर प्रकार आहे. हृदयाच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक बंद झाल्यामुळे तेथील हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यांना इजा होते. हृदयविकाराची लक्षणे ओळखणे आणि वेळ न दवडता योग्य उपचार घेणे ही जनजागृतीची महत्त्वाची बाब आहे.
….तर परिस्थिती टाळता येऊ शकेल
स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाच्या माध्यमातून ईसीजी तपासणीची सुविधा नागरिकांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकाराचा धोका असलेल्या नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीसह हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वेळेवर निदान आणि उपचारातून अनेक गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकतात. – मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण</p>
