लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध पाचव्या आठवड्यापर्यंत लांबल्याने खनिज तेलाच्या तापत असलेल्या किमती या जगभरातील गुंतवणूकदारांतील अस्वस्थता वाढवली आहे. याचेच प्रतिबिंब स्थानिक शेअर बाजारात सोमवारी उमटले आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षातील शेवटच्या व्यवहारात, सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक आपटले. निर्देशांकांच्या या मोठ्या गटांगळीने गुंतवणूकदारांना केवळ या एका सत्रात १० लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

जागतिक बाजारांमधील कमकुवत कल आणि एकीकडे रुपयांतील मोठी घसरण, तर दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून अविरत सुरू असलेली विक्री यामुळेही देशांतर्गत बाजारातील मंदीच्या प्रवृत्तीला आणखी खतपाणी घातले. यातून सेन्सेक्स १,६३५.६७ अंशांनी म्हणजेच २.२२ टक्क्यांनी कोसळला आणि ७१,९४७.५५ या पातळीवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान हा निर्देशांक १,८०९.०९ अंशांनी म्हणजेच अडीच टक्क्यांनी गडगडताना दिसला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक ४८८.२० अंशांनी म्हणजे २.१४ टक्क्यांनी आपटून, २२,३३१.४० पातळीवर दिवसअखेरीस बंद झाला.

बाजारात घसरणीचा तडाखा हा सर्वव्यापी होता. मधल्या व तळच्या फळीतील समभागांमध्ये विक्रीचा जोर मोठा असल्याने, त्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या मुंबई शेअर बाजाराच्या ‘मिडकॅप सिलेक्ट’ निर्देशांकात ३.१३ टक्क्यांची, तर ‘स्मॉलकॅप सिलेक्ट’ निर्देशांकात २.१४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. एकूण ३,५६३ समभागांत घसरण झाली, त्या उलट वाढ साधणार्‍या समभागांची संख्या अवघी ८७६ इतकीच होती.

परिस्थिती निवळण्याच्या आशा मावळल्या असून, खनिज तेलाच्या किमती त्यामुळे वाढत चालल्या आहेत; परिणामी, भारतासारख्या तेल आयात करणार्‍या अर्थव्यवस्थांसाठी महागाई आणि आर्थिक वाढीबाबतच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा काढता पाय आणि रुपयाचे अवमूल्यन, या घटकांनी बाजारावरील नकारात्मक प्रभाव आणखीच वाढवला आहे. – अजित मिश्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष, रेलिगेअर ब्रोकिंग

इराणविरोधातील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास त्याचे अत्यंत विनाशकारी परिणाम होऊ शकतात. भारत तेलासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयातीवर अवलंबून आहे. नवीन आर्थिक वर्षात प्रवेश करताना ही एक अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे. – विवेक शुक्ला, प्रादेशिक प्रमुख, एम्के ग्लोबल

रुपया ९५ पार जाऊन सावरला

अत्यंत अस्थिर राहिलेल्या सोमवारच्या सत्रात रुपया ७ पैशांनी वधारून, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९४.७८ या पातळीवर बंद झाला. तथापि सत्रादरम्यान, रुपया ९५.२२ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीपर्यंत गडगडला होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ हे रुपयासाठी गेल्या १४ वर्षांतील सर्वात आव्हानात्मक वर्ष ठरले आहे. या आर्थिक वर्षात, आतापर्यंत रुपयामध्ये सुमारे १० टक्के इतकी मोठी घसरण झाली आहे.

सहा वर्षातील सर्वात वाईट वित्तवर्ष

प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी या मावळत्या आर्थिक वर्षात अनुक्रमे सुमारे ५.१ टक्के आणि ७.१ टक्क्यांची घसरण नोंदवली. ही त्यांची २०२० नंतरची सर्वात खराब कामगिरी ठरली; २०२० मध्ये करोना महासाथीमुळे जागतिक बाजारात मोठी पडझड झाली होती. ३१ मार्च २०२६ रोजी बाजाराला सुट्टी असल्याने, सोमवार हा या आर्थिक वर्षातील व्यवहारांचा शेवटचा दिवस ठरला. अत्यंत अस्थिर राहिलेल्या मार्चमध्ये दोन्ही निर्देशांकात ५.५ टक्के ते ६ टक्के घसरण झाली आहे. सेन्सेक्स उच्चांकी स्तरावरून सुमारे ४,००० अंशांनी कोसळला आहे. निर्देशांकांत दुसरे वजनदार स्थान असलेल्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) समभागांनी तब्बल २१.२ टक्क्यांची घसरण अनुभवली आहे. महिनाभराच्या या पडझडीत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये मातीमोल झाले आहेत.