मुंबई : मेट्रोच्या अंधेरी येथील कारशेडवर दगडफेक केल्याची घटना घडली. सुदैवाने या दगडफेकीत कुणीही जखमी झाले नाही, मात्र कारशेडची काच फुटली आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंधेरी पश्चिमेच्या जे.पी. मार्गावर मेट्रो वनचे कारशेड आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कारशेडच्या काचेवर दगड भिरकावला. यामुळे कारशेडची काच तुटली तसेच छताचेही नुकसान झाले. या कारशेडसमोर अदानी हाइट्स नावाची इमारत आहे. या इमारतीमधून दगड भिरकावण्यात आल्याची शक्यता सुरक्षा व्यवस्थापक विजय मेनन यांनी व्यक्त केली. ज्यावेळी दगडफेक करण्यात आली, त्यावेळी काही जण काम करत होते, मात्र त्यांना दुखापत झाली नाही.

या दगडफेकीबाबत मेट्रो वनचे सुरक्षा अधिकारी शशिकांत माने (६४) यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मेट्रो रेल्वेज (संचालन आणि देखभाल) कायद्याच्या कलम ७८ (१) तसेच जीविताला हानी पोहोचविणारी कृती केल्याप्रकऱणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ आणि ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.