मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची इमारत पाडल्याच्या निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दादरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे दादर पूर्व भागातील काही दुकाने बंद करण्यात आली होती. यावेळी रिपब्लिकन सेनेच्या आंदोलकांनी वाहने आणि दुकानांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलिस स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. सोमवारी या पाडकामाच्या निषेधार्थ वरळीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. भविष्यात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
‘आंबेडकर भवन’वर बुलडोझर 
दादर पूर्वकडील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवना’च्या इमारतीचा ७० टक्के भाग शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास बुलडोझर चालवून पाडण्यात आला. त्यामुळे ‘दी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’चे सदस्य आणि आंबेडकर कुटुंबियांतील वाद अधिक तीव्र झाला. केवळ दादागिरीच्या जोरावर रात्री उशिरा आंबेडकर भवनाची इमारत पाडण्यात आल्याचा आरोप करत आंबेडकर कुटुंबियांनी ट्रस्टच्या विरोधात शेकडो समर्थकांसह निषेध केला. तर दुसरीकडे पालिकेने इमारत धोकादायक बनल्याची नोटीस बजावल्याने ती पाडल्याचा दावा ट्रस्टने केला आहे.