मुंबई : वातानुकूलित लोकल प्रवासाची सुविधा स्वस्त झाल्यापासून एसी लोकलच्या प्रवासीसंख्येत एकीकडे वाढ होत असताना, समाजकंटकांकडून या लोकलला लक्ष्य करण्याचे प्रयत्नही वाढू लागले आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांत मध्य रेल्वेमार्गावर वेगवेगळय़ा ठिकाणी वातानुकूलित लोकलवर दगडफेक करण्यात आल्याच्या २३ घटना घडल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूपर्यंत वातानुकूलित लोकल धावत आहे. सध्या या मार्गावर वातानुकूलित लोकलच्या ५६ फेऱ्या होत आहेत. यापूर्वी सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर आणि ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आली. हार्बरवर चेंबूर, गोवंडीसह अन्य मार्गावर, तर मुख्य मार्गावर कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कळवा, मुंब्रा यांसह काही ठिकाणी रुळांजवळच असलेल्या झोपडय़ांमधून धावत्या वातानुकूलित लोकलवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे लोकलच्या काचा फुटल्या आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांत सुमारे २३हून दगडफेकीच्या अधिक घटना घडल्या आहेत.

खिडकीची काच फुटलेल्या स्थितीत वातानुकूलित लोकलमधून प्रवास करावा लागत असल्याचे महिला प्रवासी गुरदीप कौर यांनी सांगितले. ठाण्याला जाणारी वातानुकूलित जलद लोकल आपण कुर्ला येथून सायंकाळी साडेसहा वाजता पकडली. या लोकलमधील सलग तीन ते चार खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. ही सेवा प्रवाशांसाठी आहे, त्याचे नुकसान करणे योग्य नाही. अशा समाजकंटकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तर रेल्वेनेही त्वरित खिडकीच्या फुटलेल्या काचा बसवाव्या, असेही त्या म्हणाल्या.

खिडकीच्या काचेचा खर्च दहा हजार रुपये

यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता ते म्हणाले की, वातानुकूलित लोकलची एक काच फुटली तर नवीन काच बसवण्यासाठी जवळपास दहा हजार रुपये खर्च येतो. लोकल देखभाल, दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये जाताच त्याची दुरुस्ती केली जाते. त्यामुळे कारशेडमध्ये लोकल जाताच फुटलेल्या काचा नव्याने बसवण्यात येतील. वातानुकूलित लोकलचे नुकसान करणाऱ्यांच्या विरोधात नक्की कारवाई केली जाईल, असे सुतार यांनी सांगितले.

पाच वातानुकूलित लोकल

सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात पाच वातानुकूलित लोकल असून यातील चार गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत असतात, तर एक गाडी राखीव असते. येत्या जून किंवा जुलैपर्यंत आणखी दोन वातानुकूलित लोकल येण्याची शक्यता आहे.