मुंबई : हिंदी सक्ती निर्णय रद्द झाल्यानिमित्त आयोजित विजयी मेळाव्याची जोरदार वातावरण निर्मिती कधी पत्रक तसेच चित्रफितीच्या माध्यमातून केली जात आहे. मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवून कसा यशस्वी करता येईल यासाठी खास नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना (ठाकरे) व मनसे पक्षांकडून एक संयुक्त ध्वनीचित्रफित प्रदर्शित करण्यात आली आहे.
‘ही दोन लढवय्या भावांची गाेष्ट!’ असल्याचे सांगत दाखविण्यात आलेल्या या ध्वनीचित्रफितीद्वारे दोन भावांची शक्ती एकत्र आल्यावर काय होते हा संदेश अधोरेखित करण्यात आला आहे.
ठाकरे बंधूंकडून संयुक्त पत्रांद्वारे मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर आता ध्वनिचित्रफित (टिझर) प्रदर्शित करण्यात आली. ही दोन लढवय्या भावांची गोष्ट आहे! असे म्हणत जंगलात रानकुत्र्यांच्या झुंडीत अडकलेला सिंह हल्ल्यात अडकलेला एकाकी असह्य सिंह आणि त्याला भावाची साथ मिळताच दाेन भाऊ रानकुत्र्यांच्या झुंडीला कसे पळवून लावतात यावर आधारित ही ध्वनिचित्रफीत असून ‘दोन लढवय्या भावांमुळे जंगल रानकुत्र्यांपासून मुक्त झाले…या गोष्टीचा अर्थ महाराष्ट्राला समजला असेलच.’ असा संदेश देण्यात आला आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरवणारा मेळावा! मराठीची एकजूट, महाराष्ट्राची वज्रमूठ असा संदेश देताना आगामी महापालिका निवडणुकांतील युतीची नांदीच या ध्वनिचित्रफितीतून करण्यात आली आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठी, मराठीसाठी ठाकरेच असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फलकही प्रकाशित करण्यात आला आहे.
याचबरोबर मेळाव्याचे नियोजनही युद्धपातळीवर सुरू असून मेळाव्यासाठी व्यासपीठही सज्ज होत आहे. या व्यासपीठावर अधिक गर्दी होणार नाही आणि समोर प्रेक्षकांची तूफान गर्दी उसळेल असे नियोजन करण्यात आले आहे. या व्यासपीठावर मुख्य आकर्षण उद्धव आणि राज हे दोघेच राहतील अशा प्रकारे व्यासपीठाची रचना करण्यात येत आहे.