मुंबई : अखंड कार्यरत राहणे हा काहींचा स्वभाव तर ‘बघू नंतर’ हा काहींचा. व्यक्तीबरोबरच काही संस्थांचा-राजकीय पक्षांचाही तसाच एक स्वभाव असतो. अशाच स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आणि ते घडवले मुंबईच्या पावसाने. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पावसामुळे रद्द झाल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तर त्याचवेळी मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असताना गडचिरोलीपासून ते ठाणे-पालघपर्यंतचे नेते-पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश, युवक, महिला अशा विविध आघाडय़ांच्या बैठकांचे सत्र मंगळवारपासून सुरू झाले ते बुधवारीही सुरूच होते. दोन बैठकांची ही कथा या दोन्ही पक्षांच्या राजकीय स्वभावाचे तपशील रेखाटते.

पावसामुळे बुधवारी आयत्या वेळी रद्द होण्याच्या मनसेच्या राजकीय कार्यक्रमांच्या यादीत आणखी एका बैठकीची भर पडली. आधी एखादा कार्यक्रम जाहीर होणे व नंतर तो रद्द होणे किंवा बाजूला पडणे हे मनसेच्या कार्यकर्त्यांना नवे नाही. त्यामुळे पावसाचे कारण सांगत ठरलेली बैठक रद्द झाली ते एकंदर मनसेच्या परंपरेला धरूनच झाले. बरे या बैठकीसाठी राज्यभरातून कोणी येणार होते तर तसेही नाही. मुंबईतील नेत्यांची-पदाधिकाऱ्यांचीच ती बैठक होती. पण त्यांनाही पावसात प्रवासाचा त्रास नको, असा संवदेनशील विचार मनसेने केला असावा.

गेल्या काही काळात आधी जाहीर झालेली महाआरती, अयोध्या दौरा असे वेगवेगळे राजकीय कार्यक्रम मनसेने आयत्यावेळी रद्द केले होते. मुळात सतत लोकसंपर्कासाठी दौरा, बैठका सुरू आहेत. कार्यकर्ते-पदाधिकारी यांचे अखंड काही राजकीय कार्यक्रम सुरू आहेत असा काही मनसेचा लौकीक नाही. आताही मनसेचा मेळावा रद्द करताना पावसाचे कारण सांगण्यात आले. पक्ष जो कार्यक्रम देणार होता तो सध्याच्या परिस्थितीत राबवणे शक्य नसल्याने बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. पावसाचा अंदाज घेऊन बैठकीची पुढच्या तारीख ठरवण्यात येईल असेही सांगण्यात आले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत राज्यभरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते शरद पवार-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदींसह सर्व प्रमुख नेते राज्यभरातील पदाधिकारी यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सभागृह भरलेले होते. सकाळी ११ ते दुपारी दोन-अडीच पर्यंत प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची बैठक झाली. त्यानंतर बुधवारीही मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असताना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची बैठक सुरू आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाच पक्ष कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करणे, सत्तांतरानंतर आता पक्ष विरोधी बाकांवर असला तरी राजकीय पातळीवर लोकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक होऊन काम करण्याचे व प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची चर्चा या बैठकीत झाली. शिवसेना फुटल्याचे संभाव्य राजकीय परिणाम व त्यात राष्ट्रवादीने कशी वाटचाल करायची याबाबत पक्षाचे सर्वोच्च नेते राज्यभरातील प्रदेश, युवक, महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यथा राजा तथा प्रजा ही उक्ती संघटनेलाही लागू होते. नेता कार्यरत असेल तर कार्यकर्ते धडपड करत राहतात आणि नेताच या ना त्या कारणाने नंतर बघू अशा भूमिकेत असेल तर संघटनेतील कार्यकर्तेही निवांत राहतात हाच आशय या दोन बैठकांतून पुन्हा समोर आला.

शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला. तसेच स्वत: पवार मुंबईत लक्ष घालणार आहेत. कोणता पक्ष बरोबर येईल याचा विचार न करता काम सुरू करा, अशी सूचना पवार यांनी केली.

पर्जन्यकारण..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील सर्व नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष ते उपाशाखाध्यक्ष अशा पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बोलावली होती. मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे या बैठकीत सर्वाशी संवाद साधणार होते. मात्र पावसामुळे ही बैठक रद्द झाल्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला.

चित्र दुसरे..

पावसामुळे मनसेची तीही मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील अगदी गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गपर्यंतचे पदाधिकारी मुसळधार पावसात मुंबईत बैठकीसाठी हजर होते.