संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई- राज्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करतानाच काही अभिनंव योजनांची अमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाला पुरेसा निधी मिळेल अथवा नाही याची कल्पना नाही, मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक चांगल्या योजनांचा अभ्यास करून त्याची अंमलबजवणी राज्यात करण्याचा निर्धार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याबरोबरच माता-बालआरोग्य, आदिवासी आरोग्य, आरोग्य विभागासाठीची औषधे व उपकरणांची खरेदी, नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी, ग्रामीण आरोग्य व शहरी आरोग्य तसेच साथीचे आजार आणि असंसर्गजन्य आजारांसह केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी आदी अनेक मुद्यांवर आरोग्य विभागातील वरिष्ठ डॉक्टरांची पथके आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि राजस्थान या चार राज्यात पाठविण्यात आली होती. तामिळनाडू राज्यातील औषध खरेदी व वितरण प्रणालीचा अभ्यास उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, प्राचार्य डॉ. सुशील वाकचौरे, सहाय्यक संचालक डॉ. उमेश शिरोडकर, उपसंचालक डॉ. आर. गलांडे यांची समिती गेली होती. या समितीने तामिळनाडूतील पायाभूत आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानाचा समन्वय, माता बाल आरोग्य, साथीच्या आजारांचे नियंत्रण याचाही आढावा घेतला.

राज्याचे अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल आणेराव, उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, उपसंचालक डॉ संजय देशमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांच्या पथकाने केरळंमधील आरोग्ययंत्रणेचा तसेच तेथे आरोग्य विषयक कायद्यांची अंमलबजावणी कशी केली जाते याचा अभ्यास केला. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी तर केरळची साडेतीन कोटी असून शासकीय आरोग्ययंत्रणेचे जाळे महाराष्ट्रापेक्षा बळकट आहे. केरळमध्ये १८ जिल्हा रुग्णालये, १८ सामान्य रुग्णालये, १० महिला रुग्णालये, ८४४ प्राथमिक आरोग्यकेंद्र तर ५,४१५ उपकेंद्रे आहेत. महाराष्ट्रात २२ जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, २० महिला रुग्णालये, १९०८ प्राथमिक आरोग्य केंद्र तर १०,७४८ उपकेंद्र आहेत. केरळमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यास महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे जाळे अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजस्थानमधील आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सतीश हरदास,डॉ. विनीता जैन आणि डॉ. एच व्ही वडगावे यांनी केला. यात प्रामुख्याने राजस्थानमधील नाविन्यपूर्ण आरोग्य योजनांचा अभ्यास तसेच आशा सेविकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आरोग्य व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला. अशाचप्रकारे आंध्रप्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या चारही राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या अभ्यासाचा तसेच राज्यात कोणत्या नावीन्यपूर्ण योजना राबवता येतील याबाबत एका बैठकीचे आयोजन केले. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आरोग्यमंत्री बनल्यानंतर तानाजी सावंत यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित, बाल आरोग्य तपासणी मोहीमेसह काही राज्यव्यापी आरोग्य मोहीमा राबविल्या होत्या. तथापि आरोग्य विभागात रिक्त असलेली १७ हजार पदे, आरोग्य संचलनालयातील संचालकांपासून उपसंचालकांची रिक्त पदे तसेच स्पेशालिस्ट डॉक्टरांची रिक्त पदे यामुळे आरोग्ययंत्रणेचा गाडा प्रभावीपणे चालविण्यात अनेक अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत आरोग्यमंत्री सावंत यांना विचारले असता गेल्या अनेक वर्षात आरोग्य विभागाच्या विविध संवर्गातील डॉक्टरांना नियमित पदोन्नती मिळत नसल्याचे लक्षात आले. यासाठी बिंदूनामावली तयार करणे आवश्यक असून एका महिन्यात ही बिंदूनामावली तयार करण्यात सांगितल्याचे ते म्हणाले. नियमित पदोन्नती व राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून रिक्त पदांची भरती याला आपण प्राधान्य दिले असून लवकरच दोन्ही आरोग्य संचालकांची पदे भरली जातील असेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन दशकात डॉक्टरांच्या नियमित पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या बिंदूनामावलीसह काही गोष्टी केल्या गेल्या नव्हत्या. मी याला प्राधान्य दिले असून यापुढे डॉक्टरांना नियमित पदोन्नती मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या प्रशासकीय व अन्य प्रशिक्षण कार्यक्रमही तयार करण्यात येत असून त्याचीही आगामी काळात अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करताना ग्रामीण भागाचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणे, तसेच उपकेंद्र बळकटीकरण करणे याला प्राधान्य राहणार आहे. मधुमेह व उच्च रक्तदाब या असंसर्गजन्य आजारांमुळे हृदयविकारापासून मूत्रपिंड विकारापर्यंतच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात घेऊन राज्यात १९ ठिकाणी कॅथलॅब, हृदयविकारशस्त्रक्रियागृह, सीटी स्कॅन व मॉड्युलर शस्त्रक्रियागृह बांधण्यात येणार आहेत. तसेच ३७७ डायलिसीस मशिन नव्याने घेण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांनी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. मुतखड्याच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन २८ लिथोट्रेप्सी मशिन घेण्याचा मानस आरोग्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र औषध खरेदी महामंडळाच्या निर्मितीचे काम सुरु असून तामिळनाडूची भेट यासाठी महत्त्वाची ठरली आहे. तसेच वेगवेगळ्या राज्यातील नाविन्यपूर्ण योजना आणि राज्यातील आरोग्य विभागाची गरज याची सांगड घालून काही अभिनव आरोग्य योजना आगामी काळात राबविल्या जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.