मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून या सवलतींमुळे राज्यभरातील प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहकांवरील कामाचा ताण वाढू लागला आहे. बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास, वारंवार बिघडणारी तिकीट यंत्रे, तुलनेने अपुरे मनुष्यबळ यामुळे वाहकांना तिकीट देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिकीट पर्यवेक्षकाने विनातिकीट प्रवाशांना पकडल्यानंतर वाहकांची नोकरी धोक्यात येते.

राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत दिली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची, तर ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. एसटीच्या बसमधून १७ मार्चपासून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र, या सवलती वाहकांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. एसटीच्या ताफ्यात अनेक गाड्या नादुरुस्त आहेत. पुरेशा प्रमाणात नव्या गाड्या आलेल्या नाहीत. प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे अनेक गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतात. त्यामुळे वाहकांना काम करताना अडचणी येत आहेत. तसेच, तिकीट यंत्रांची निकृष्ट दर्जाची बॅटरी, अचानक यंत्र बंद पडणे, यंत्रांची सदोष बटणे आदी तक्रारी वाहकांकडून वारंवार करण्यात येत आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा

हेही वाचा >>> मुंबईत पक्ष वाढीसाठी स्वत: शरद पवार यांनी लक्ष घातले

एसटी बसमधील प्रवाशांची गर्दी वाढली ही बाब चांगली आहे. प्रवासी आमच्यासाठी सर्वस्व आहे. मात्र, महिला आणि ज्येष्ठांना सवलतीच्या दरातील तिकीट देण्यासाठी तिकीट यंत्र योग्य नाहीत. तिकीट यंत्रावरील एका बटणामध्ये सवलतीचे तिकीट मिळण्याची सोय करणे गरजेचे आहे.

– मुंबई सेंट्रल आगारातील वाहक

तिकीट यंत्रामध्ये कायम बिघाड होत असतो. तिकीट यंत्राची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे यंत्राची बॅटरी चार्ज करायची की तिकीटे काढायची, असा प्रश्न निर्माण होतो. कागदी तिकीटचा पर्याय पुढे केला जातो. मात्र, अनेक वाहकांची कागदी तिकीट काढण्याची सवय मोडली आहे.

– कोल्हापूर आगारातील वाहक

वाहक म्हणून २००९ नंतर रुजू झालेल्या वाहकांना कागदी तिकीट काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. फक्त कागदोपत्री शिकवणी झाली आहे. त्यामुळे या वाहकांना तिकीट देताना अडचणी येतात. तसेच, संपूर्ण तिकिटाचे गणित मांडून तिकीट देण्यास विलंब होतो.

– यवतमाळमधील पुसद आगारातील वाहक

महिला सन्मान योजना आणि अमृत महोत्सवी योजनेमुळे एसटी बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास होत आहे. त्यामुळे वाहकांसह चालकांवरही त्याचा ताण येतो. चालकाला ब्रेक लावणे कठीण होते. चढणाला बस ”पीकअप” घेत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने नव्या एसटी बस खरेदी करून राज्यभर चालवणे आवश्यक आहे.

– लातूर आगारातील वाहक

महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. त्यात कमी अंतराच्या फेऱ्यांमध्ये जवळजवळ थांबे असतात व सवलतधारक प्रवाशांना तिकीट देणे व त्याचे पैसे देणे- घेणे याला वेळ पुरत नाही. तिकीट यंत्रामधून सवलतधारक प्रवाशांना तिकीट देण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. त्यावरून रोज वाद होतात. सुट्या पैशाची अडचण होते. चलनात साधारण ५०० रुपयांच्या नोटा सर्रास वापरल्या जात आहेत. त्यामुळे वाहकाला खूप त्रास होतो. यंत्राद्वारे तिकीट देण्याच्या पद्धतीमध्ये गती आणण्याची गरज आहे

– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

सध्या एसटी बसमध्ये वाढलेले प्रवासी हे करोना पूर्व काळाच्या तुलनेत कमीच आहेत. त्यामुळे सध्याची वाढलेली संख्या ही वाहकांवर ताण येणारी नाही. जी तिकीट यंत्रे जुनी झाली आहेत किंवा नादुरूस्त आहेत त्यांच्याऐवजी कागदी तिकीटाचा वापर केला जातो. जूनपासून नवीन तिकीट यंत्रे वाहकांना देण्यात येणार असून त्यात सवलतीचे तिकीटही जलदगतीने देण्याची सुविधा आहे. कागदी तिकीट काढण्यासाठी प्रत्येकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, वाहकांच्या सरावाचा मुद्दा असू शकतो. नवीन तिकीट यंत्रे आली तरी, कागदी तिकीटे गरजेच्यावेळी वापरता येणार आहेत.

– शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ