मुंबई : अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान दक्षता समितीमार्फत (पीसीपीएनडीटी) नियंत्रण ठेवण्यात येणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील काही रुग्णालयांत जवळपास ८४३ ऊसतोड महिला कामगारांच्या अवैध व अनावश्यक गर्भ पिशव्या काढल्याची बाब उघडकीस आली होती. याची दखल घेऊन विधान परिषद सदस्या चित्रा वाघ यांनी बैठक घेण्यासंदर्भात प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी केली होती. अवैधपणे गर्भ पिशव्या काढण्यात आल्याच्या गंभीर प्रश्नांची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी मंत्रालयातील कार्यालयात विशेष बैठक बोलवली होती. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, चित्रा वाघ यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेचा विषय अत्यंत संवेदनशील व गंभीर आहे. शासनाच्या कार्यपद्धतीनुसारच शस्त्रक्रिया होतील याबाबत दक्ष राहण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच गर्भ पिशव्या अवैधपणे काढल्याच्या तक्रारीचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले. अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रियेनंतर महिलांवर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी प्रकाश आबिटकर यांनी केली.
महिलांच्या आरोग्याच्या बाबतची कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नाही. तसेच पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत खाजगी रुग्णालयाकडून दरमहा अहवाल घ्यावा. तसेच कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश त्यांनी यावेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे गर्भाशय शस्त्रक्रियेच्या अहवालाची पडताळणी आरोग्य विभागाने करावी, अशी सूचनाही त्यांनी केल्या. तसेच सर्व वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय स्तरावरही गर्भाशय शस्त्रक्रियेस परवानगी देण्याबाबत शहानिशा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.