आचाऱ्यांसाठी हातमोजे, टोपी, ‘अ‍ॅप्रनबंधनकारक; नियमभंग केल्यास परवाना नूतनीकरण नाही

हॉटेल, रेस्तराँ तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलसाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मार्गदर्शक नियमावली जारी केली जाणार असून या नियमावलीनुसार यापुढे स्वयंपाकगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हातमोजे (ग्लोव्हज), टोपी (हेअर कॅप) तसेच ‘अ‍ॅप्रन’ बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारची परवानगी मिळताच ही नियमावली अमलात येणार आहे. तसेच या नियमांचा भंग करणाऱ्या हॉटेल किंवा स्टॉलधारकांचे परवाने नूतनीकरण रोखले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यात तब्बल साडेपाच लाख रेस्तराँ तसेच इतर छोटे-मोठे स्टॉलधारक आहेत. त्यांच्यासाठी ही नियमावली जारी केली जाणार आहे. मुंबईत ३० हजार परवानाधारक हॉटेल्स आणि रेस्तराँ तसेच ७५ हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. पावसाळी आजारांसाठी अस्वच्छता कारणीभूत असते. अन्नसुरक्षा आणि प्रमाण कायद्यातील शेडय़ुल्ड चारनुसार स्वच्छता बंधनकारक असतानाही त्याचे अनुकरण केले जात नाही, याकडे अन्न व औषध प्रशासनातील एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले. अशी नियमावली जारी करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक आहे. नियमावली जारी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित हॉटेल्स, रेस्तराँ, खाद्यपदार्थ स्टॉलधारकाच्या परवान्याचे नूतनीकरण रोखण्याची कारवाई करता येऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशी नियमावली जारी झाल्यास त्याबाबतची सूचना हॉटेल्स, रेस्तराँ, खाद्यपदार्थाच्या स्टॉलबाहेर प्रदर्शित करावयाची आहे. ग्राहकांनीही याबाबत जागरूक राहावे आणि स्वच्छता या मुद्दय़ावर संबंधित विक्रेते काळजी घेत आहेत किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याचे आवाहनही केले जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नव्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

काय असेल नियमावली?

  • स्टेनलेस स्टीलच्या भांडय़ात खाद्यपदार्थ तयार करणे
  • स्टीलच्या ताटांचा वापर करणे
  • किचनमध्ये स्वच्छता असावी
  • पिण्याच्या पाण्याचाच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापर करणे
  • खाद्यपदार्थाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज्, हेअर कॅप, अ‍ॅप्रन वापरावा
  • खाद्यपदार्थ देण्यासाठी वृत्तपत्राचा वापर टाळणे
  • त्वचा रोग असलेल्या व्यक्तीला प्रतिबंध
  • धूम्रपान, तंबाखू खाऊन थुकण्यावर प्रतिबंध