‘एनआयए’ला धमकी देणारा विद्यार्थी अटकेत

मुंबईत येण्याआधी अनेकदा तो जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास होता, अशी माहिती पुढे येत आहे.

 मुंबई : मुंबईत दहशतवादी हल्ला होणार आहे, रोखू शकलात तर रोखा, अशी धमकी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्ली येथील मुख्यालयाला दूरध्वनीवर देणाऱ्या  शुभमकुमार पाल (वय २२) या तरुणाला मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली.

तो दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. विशेष बाब ही की एनआयए कार्यालयाला दूरध्वनी करण्याआधी त्याने पाकिस्तानात बरेच दूरध्वनी केले होते. मुंबईत येण्याआधी अनेकदा तो जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास होता, अशी माहिती पुढे येत आहे.

त्याने आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सिरिया आणि अन्य विषयांबाबत आंतरजालातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले.

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एनआयएच्या दिल्ली येथील मुख्यालयात निनावी दूरध्वनीवर  ‘बॉम्बेमे कुछ बडा होने वाला है, रोक सको तो रोकलो,’ असे त्यावर सांगण्यात आले. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. सुरक्षिततेचा भाग म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यासोबत राज्य दहशतवादविरोधी पथक, एनआयएचे विभागीय पथक आणि मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने स्वतंत्रपणे दूरध्वनी करणाऱ्याचा शोध सुरू केला होता.

प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, सागर शिवलकर, निरीक्षक संजीव गावडे, रईस शेख, सहायक निरीक्षक शरद झिने आणि पथकाने तांत्रिक तपासातून गोरेगावच्या नेस्को, आयटी पार्क येथून आरोपी शुभमला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत एनआयएआधी शुभमने चारवेळा पाकिस्तानात विविध दूरध्वनी केल्याच्या आणि भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्याच्याही नोंदी आढळल्या. पथकाने केलेल्या पुढील तपासणीत शुभमने पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले. याबाबत शुभमने उडवाउडवीची उत्तरे दिली.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार शुभमच्या वडिलांचा गिर्यारोहण, प्रस्तरारोहणासाठी आवश्यक उपकरणे विकण्याचा व्यवसाय आहे. त्यानिमित्ताने शुभमही वरचेवर जम्मू-काश्मीर, लेह-लडाख या भागात वरचेवर जातो. दिल्लीच्या मेहरोली भागातील गढवाल संकुलात राहाणारा शुभम घरात भांडण झाल्याने मुंबईत पळून आल्याचे आणि दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगत आहे. मात्र त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Student arrested for threatening nia zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या