मुंबईः अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षेकाला अटक केल्यानंतर सहआरोपी असलेली महिला डॉक्टर सध्या परदेशात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुलाला नैराश्य आल्याने शिक्षिकेच्या डाॅक्टर मैत्रिणीने मध्यस्थी केली. त्या मैत्रिणीने मुलाला नैराश्य घालविण्यासाठी डॅक्सिट-५०एमजी ही गोळी दिली होती. शिवाय महिला डॉक्टरने मुलाची समजूतही काढली होती. मुलाला नैराश्य घालवणारी गोळी देणारी तसेच शिक्षिकेला गुन्ह्यांत मदत करणारी डाॅक्टर गेल्या नोव्हेंबरपासून परदेशात असल्याचे सांगण्यात येते.
नेमका काय प्रकार घडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेला वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्याचा छळ करीत होती. त्यामुळे तो तणावाखाली होता. शाळेत इंग्रजी विषय शिकवणारी आरोपी शिक्षका विवाहीत असून तिला एका मुलगा आहे. डिसेंबर २०२३ मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी या शिक्षिकेच्या संपर्कात आला होता. जानेवारी २०२४ मध्ये या शिक्षिकेने दादर पोलिसांच्या हद्दीत पहिल्यांदा या विद्यार्थ्यावर अत्याचार केला. विद्यार्थ्याने सुरुवातीला दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण ही शिक्षिका मैत्रिणीच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत होती. त्यामुळे तो तणावाखाली होता. आरोपी महिलेने त्याला मोटरगाडीतही बसवून दादर पोलिसांच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी महिलेने नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी औषधाच्या गोळ्याही खाण्यासाठी दिल्या होत्या, असा आरोप आहे. तसेच महिलेने मुलाला पंचतारांकीत हॉटेलमध्येही नेले होते. त्यामुळे मुलगा नैराश्यात गेला होता. याप्रकरणात शिक्षिकेला मदत करणारी महिला डॉक्टर गेल्यावर्षी दिवाळीमध्ये युकेला गेली होती. तेव्हापासून तेथेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोबाईल ब्लॉक केल्यानंतर शिक्षिकेने मदतनीसाला धाडले
मुलाने फेब्रुवारी महिन्यात शिक्षिकेशी संपर्क तोडला होता. त्याने तिचा मोबाईल ब्लाॅक केला होता. त्याने एकदा भेटावे यासाठी शिक्षिकेने तिच्या घरी कामात मदत करणाऱ्या महिलेला मुलाच्या घरी पाठवले. मॅडमचे पैसे घेतलेत ते द्यायला मॅडमना भेटायला ये असे खोटे सांगून महिलेने शिक्षिकेशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी शिक्षिका मुलाला त्रास देत असल्याचा संशय अधिक बळकट झाला. पालकांनी तात्काळ याप्रकरणी मुलाला विश्वासात घेऊन त्याला विचारणा केली असता सत्य उघड झाले. त्यांनी याप्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, बालकांची काळजी अधिनियम व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून महिला शिक्षिकेला अटक केली. यावेळी महिला डॉक्टरची मानसशास्त्रीय चाचणी करायचे असल्याचे सांगून न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार महिलेला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तिला आज पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोपी महिलेने चौकशीत मुलावरील प्रेमापोटी सर्व केल्याचे चौकशीत सांगितले.