देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील एका उपनगरात विद्यार्थ्यांना कामचलाऊ तराफ्याच्या आधारे जीव व नाक मुठीत धरून शाळा गाठावी लागते, असे सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र सांताक्रूझच्या पश्चिमेस असणाऱ्या गजधर बांध येथे गेल्या पंधरा वर्षांपासून हा जीवघेणा प्रकार सुरू आहे. दररोज सुमारे पाचशे विद्यार्थी एका कामचलाऊ तराफ्याच्या साहाय्याने भलामोठा नाला पार करीत असून सरकारचे त्याकडे लक्ष नाही.
उत्तुंग इमारती आणि अद्ययावत सोयीसुविधा ही सांताक्रूझ पश्चिमेची ओळख. मात्र तेथेच गजधर बांध ही वस्ती आहे. दीड ते दोन किलोमीटरच्या परिघात विस्तारलेल्या या वस्तीला लागूनच एक भला मोठा नाला आहे. सबंध वस्तीभर त्याची दरुगधी पसरलेली असते. चहुबाजूला कचऱ्याचेही साम्राज्य आहे. या नाल्याच्या एका बाजूला होली क्रॉस शाळा असून दुसऱ्या बाजूला महापालिकेची माणेकजी गजधर ही शाळा आहे. या वस्तीतील विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा वळसा पडतो. शाळेत पायी गेल्यास ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. तर, रिक्षाने गेल्यास २० ते ३० रुपये भाडे होते. हे दोन्ही पर्याय मानवण्यासारखे नसल्याने बहुतांश विद्यार्थी तराफ्याच्या आधारे नाला पार करतात. अशा विद्यार्थ्यांची संख्या थोडीथोडकी नसून पाचशेच्या घरात आहे.
हे विद्यार्थी तसेच स्थानिकांची निकड लक्षात घेऊन बाबू वाघेला या स्थानिकाने १५ वर्षांपूर्वी तराफ्याच्या फेऱ्या सुरू केल्या. प्लॅस्टिकच्या गोण्यांत थर्माकोलचे तुकडे भरून आणि लाकडी फळकुटाला बांधून एक कामचलाऊ पाण्यावर तरंगणारे वाहन वाघेलाने तयार केले आहे. या तराफ्यातून रोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. आता त्याचा मुलगा संजय हा व्यवसाय सांभाळत आहे. प्रवाशांना नाल्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी एका फेरीला केवळ एक रुपया आकाराला जातो.
मात्र नाला खोल असल्याने व हा तराफाही फार भरवशाचा नसल्याने कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. महापालिकेने हा नाला माती टाकून बुजवून टाकावा, अन्यथा या नाल्यावर पूल बांधावा, अशी मागणी राजेश नाईक या स्थानिक तरुणाने केली आहे.