scorecardresearch

परदेशी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही काही वर्षे कठीण ; काम करण्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा अभाव, खासगी रुग्णालयांकडे अधिक कल

भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेल्या स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थी आता परदेशी शिकण्याची सोपी वाट निवडत आहेत. 

मुंबई : युक्रेन, चीन, रशिया, जॉर्जिया इत्यादी देशांमधून वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेऊन भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पुस्तकी ज्ञान पुरेसे असले तरी प्रत्यक्ष रुग्णांना तपासण्याच्या अनुभवाचा अभाव असल्याचे निरीक्षण डॉक्टर, प्राध्यापकांनी नोंदवले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना  काही वर्षे बरेच झगडावे लागत असल्याचे मत विद्यार्थी आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.

युक्रेन आणि रशियातील युद्धस्थितीमुळे यासारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव, गुणवत्ता आणि भारतात परतल्यावर काम करण्यासाठी पात्र ठरण्याची क्षमता असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेल्या स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थी आता परदेशी शिकण्याची सोपी वाट निवडत आहेत.  पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भारतातील सरकारी रुग्णालयांत एक वर्ष सेवा करणे या विद्यार्थ्यांना बंधनकारक असते. त्यानंतरच संबंधित राज्यातील वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणीसाठी अर्ज करता येतो. पात्रता असल्याची खात्री झाल्यानंतरच परिषदेमार्फत या विद्यार्थ्यांची एमबीबीएस म्हणून नोंदणी केली जाते आणि डॉक्टर म्हणून सेवा देण्यासाठी परवानगी मिळते.

विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासक्रम शिकविला जात असला तरी या देशांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता जास्त असल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णांवर काम करण्याचा अनुभव फारसा नसतो. त्यामुळे आंतरवासिता (इंटर्नशिप) म्हणून एक वर्ष सरकारी रुग्णालयात सेवा देताना त्यांच्यासमोर अनंत अडचणी उभ्या राहतात. परंतु काळानुसार ही मुले शिकून घेतात आणि पदव्युत्तरच्या परीक्षांची तयारी करतात. काही विद्यार्थी पुन्हा परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जातात, असे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

पात्रता परीक्षेत पात्र झालेले बहुतांश विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीटची तयारी करतात आणि प्रवेश मिळेल त्या शाखेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात. तेथे प्रवेश मिळाला नाही तर सीपीएस, डीएनबी या माध्यमातून पदव्युत्तर पदवी मिळतात. यातील बहुतांश डॉक्टर हे खासगी किंवा कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये सेवा देतात आणि अनुभव घेतात. काही काळानंतर स्वत:चे रुग्णालय किंवा दवाखाना सुरू करतात. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाय रोवण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे अधिक काळ प्रयत्न करावे लागतात, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. 

परदेशात विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष

परदेशात शिक्षणासाठी येणारे सर्वच विद्यार्थी मेहनतीने शिकतात असे नाही. यातील बहुतांश तेथील व्यवसाय आणि राहणीमान यात अडकून जातात. त्यामुळेच त्यांना भारतातील परीक्षा उत्तीर्ण करण्यात अडचणी येतात. परिश्रम करून अभ्यास केल्यावर भारतातील परीक्षा देणे अवघड नाही, असेही मत एका विद्यार्थ्यांने व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Student with foreign medical degree struggles for a few years zws

ताज्या बातम्या