मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या बाह्य़ लेखी परीक्षांप्रमाणेच अंतर्गत (इंटर्नल) परीक्षांकरिताही पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. नुकत्यात झालेल्या विद्वत परिषदेने याला मंजुरी दिली आहे.

यात विद्यार्थ्यांने अंतर्गत गुणांचा भाग म्हणून सादर केलेल्या प्रकल्पाची फोटोकॉपीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने लिखित स्वरूपात सादर केलेल्या प्रकल्पाला किती गुण मिळाले, तसेच प्रकल्पाची फोटोकॉपी मिळवता यावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. विद्यापीठाच्या प्रचलित नियमांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मार्च/ एप्रिल २०१६ ला सहाव्या सत्रासाठी सादर केलेल्या प्रकल्पासाठी या निर्णयाचा उपयोग करण्यात येणार आहे.

प्रथम वर्ष प्रवेशाची आणखी एक संधी

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तृतीय यादी जाहीर झाल्यानंतरही जे विद्यार्थी प्रवेशाविना असतील त्यांच्याकरिता तसेच ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोंदणी केलेली नाही त्यांच्याकरिता २ ते १५ जुलैदरम्यान पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाची ऑनलाइन पूर्वनोंदणी लिंक सुरू केली जाणार आहे.